राष्ट्रवादी,काँग्रेसशी युती करूनही खानापूरमध्ये चंद्रकांत पाटलांना धक्का,सेनेचा विजयी षटकार

मुंबई नगरी टीम

कोल्हापूर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे धक्कादायक निकाल हाती आले आहेत. सत्ताधारी शिवसेनेने ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे यश मिळवले असून भाजपला अनेक ठिकाणी अनपेक्षित धक्के मिळाले आहेत. यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच खानापूर गावात सर्वात मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेने खानापूर गावातील ६ जागांवर विजय मिळवला असून जबरदस्त कामगिरी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे खानापूरमध्ये स्थानिक पातळीवर भाजपने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी हातमिळवणी करत शिवसेनेविरोधात दंड थोपटले होते. त्यामुळे गावातील या अनोख्या आघाडीची राज्यभरात चर्चा देखील होती. मात्र शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी खानापूरमध्ये सत्तापालट करून दाखवला आहे.

कोल्हापूरमधील खानापूर गावात सध्या भाजपची सत्ता आहे.त्यामुळे शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपने चक्क राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली होती. भुदरगड तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे स्थानिक नेते शिवसेनेविरोधात एकत्र आले होते. या आघाडीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. तर या ग्रामपंचायत निवडणुकीत खानापूरमधील ही आघाडी राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती. पंरतु खानापूरमध्ये ६ जागांवर शिवसेनेने विजय मिळवला आहे.

खानापूर गावात आबिटकर गटाला रोखण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी युती केली होती. प्रकाश आबिटकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे या तिन्ही पक्षांना मात देत ग्रामपंचायतीची सत्ता खेचून आणणे शिवसेनेसाठी आव्हान मानले जात होते. अखेर शिवसेनेने ६ जागांवर विजय मिळवत सत्तापालट करून दाखवला आहे. चंद्रकांत पाटील यांचा त्यांच्याच गावात झालेला हा पराभव भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Previous articleअर्णब प्रकरणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह,गृहमंत्री अमित शहा आणि राज्यातील भाजप नेत्यांनी भूमिका मांडावी
Next articleगंभीर आरोप होवूनही परळीत धनुभाऊंना जनतेची खंभीर साथ