अर्णब प्रकरणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह,गृहमंत्री अमित शहा आणि राज्यातील भाजप नेत्यांनी भूमिका मांडावी

मुंबई नगरी टीम

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचे कथित व्हॉट्सअ‍ॅप चॅट समाज माध्यमांत व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.यावरून राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर निशाणा साधलेला असतानाच शिवसेनेने देखील यावर भाष्य केले आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब असून देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भूमिका मांडावी. तसेच राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांनी या प्रकरणावर भूमिका मांडावी. म्हणजे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या ज्ञानात भर पडेल, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.

संजय राऊत यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना यासंदर्भात भाष्य केले.अर्णब गोस्वामी यांच्या प्रकरणावर राज्यातील भाजप नेत्यांनी बोलणे गरजेचे आहे. इतरवेळी जे शिवसेना,राष्ट्रवादी, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज यांच्याविषयी बोलत असतात. त्यांनी आता या विषयावर मत व्यक्त केले पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षा, लष्कराची गुपिते देशाच्या सुरक्षेविषयी काही महत्त्वाची माहिती अशा प्रकारे बाहेर येत असेल तर, तो राष्ट्रीय सुरक्षेला फार मोठा धोका आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. अर्णब हा जणू काही आपण राष्ट्रीय सल्लागार असल्याच्या थाटात हे सगळे चॅट समोर आले आहे. त्यामुळे देशाचे संरक्षण मंत्री, गृहमंत्र्यांनी भूमिका मांडावी. याशिवाय राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांनी या प्रकरणावर बोलावे.म्हणजे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या ज्ञानात भर पडेल,असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

लष्कराची काही गुपिते असतात ती मोठं मोठ्या अधिकाऱ्यांना देखील माहित नसतात. अशा प्रकरची ही गुपिते बाहेर येतात. एखाद्या जवानाकडे मॅप किंवा कागद मिळाला तरी त्यांना पकडून त्यांचे कोर्ट मार्शल केले जाते. त्यानंतर त्यांचे काय होते हे माहीतही पडत नाही. पुलवामा आणि बालाकोटच्या हल्ल्याबद्दल अर्णब यांना आधीच माहित होते. याचाच अर्थ देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला कुठेतरी सुरुंग लागला होता. त्यामुळे अर्णब यांचे कोर्ट मार्शल होणार का?, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

पक्षाच्या विस्तारासाठी निवडणूक लढणार

संजय राऊत यांनी यावेळी पश्चिम बंगाल निवडणुकीविषयी देखील भाष्य केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आमची बैठक झाली असून पश्चिम बंगालमध्ये आम्ही लढू शकतो, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी शिवसेनेचे काही प्रमुख नेते पश्चिम बांगलामध्ये जाऊन तिथला दौरा करतील आणि माहिती घेतील. त्यानुसार आम्ही किती जागा लढू शकतो याचा निर्णय घेतला जाईल. पश्चिम बंगालमध्ये आम्ही बरीच वर्षे काम करत आहोत. आम्ही कुणाला मदत करायला किंवा कुणाला हरवण्यासाठी जात नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. पक्षाचा विस्तार व्हावा यासाठी ही निवडणूक किती फलदायी आहे, हे आम्ही पाहू. तिथे सध्या हिंदुत्व आणि राष्ट्रवादाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे शिवसेना हा एक पर्याय होऊ शकतो. तसेच आमचे हिंदुत्व हे देशात लोकप्रिय आहे, असेही त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.

ही तर सुरुवात आहे

राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने मोठी मुसंडी मारली आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी ही तर सुरुवात आहे, असे सूचक वक्तव्य केले. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने मोठे यश मिळवले असून भाजपला अनेक ठिकाणी धक्का बसला आहे.

Previous articleकोकणवासीयांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार;चिपी विमानतळ उड्डाणासाठी सज्ज
Next articleराष्ट्रवादी,काँग्रेसशी युती करूनही खानापूरमध्ये चंद्रकांत पाटलांना धक्का,सेनेचा विजयी षटकार