कोकणवासीयांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार;चिपी विमानतळ उड्डाणासाठी सज्ज

मुंबई नगरी टीम

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून विमानतळ उड्डाणासाठी सज्ज असल्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले.यामुळे अनेक वर्षांचे कोकणवासीयांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे.

सामंत म्हणाले, चिपी विमानतळाचे काम पूर्ण झाले असुन काही तांत्रिक बाबींच्या पुर्ततेसह जानेवारी अखेरपर्यंत येथून कोकणातील सामान्य माणूस मुंबईत जाऊ शकेल. सामान्य नागरिकांना आपल्या कामांसाठी या सुविधेचा फायदा होणार असून गेल्या अनेक वर्षांचे त्यांचे विमान प्रवासाचे स्वप्न या माध्यमातून पूर्ण होणार आहे.

सामंत म्हणाले, हे विमानतळ सांघिक प्रयत्नातून तयार होत आहे. यासाठी कोणाचाही विरोध नाही. राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात योग्य तो समन्वय असून कोणीही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः यामध्ये लक्ष देत असून लवकरच विमान उड्डाणाची तारीख जाहीर करण्यात येईल. चिपी विमानतळ हे उडान योजनेंतर्गत असल्याकारणाने याच्या प्रवासासाठी केवळ २ हजार ५०० रुपये लागणार आहेत.या विमानतळासाठी केंद्र सरकारकडून योग्य ते सहकार्य लाभत आहे. येत्या आठ ते दहा दिवसात या विमानतळाचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असून सर्वांना या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

चिपी विमानतळ होत असल्यामुळे सामान्य नागरिकांची व्यवस्था होणार आहे. तसेच या माध्यमातून पर्यटनास चालना मिळणार आहे. या ठिकाणापासून गोवा जवळ असल्याकारणाने त्याचाही या भागाच्या विकासासाठी फायदा होणार आहे, असे आमदार दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले.चिपी विमानतळाच्या अंतिम टप्प्यात सुरू असलेल्या कामांच्या पाहणीसाठी पालकमंत्री सामंत यांनी आज विमानतळास भेट दिली. आज केलेल्या पाहणीत रस्ते सुशोभीकरण, संरक्षण व्यवस्था, पाणी व्यवस्था, विजेची उपलब्धता, धावपट्टी, तांत्रिक बाबी अशा विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी, आमदार वैभव नाईक,जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी व संबंधित उपस्थित होते.

Previous articleराज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव : प्रविण दरेकर
Next articleअर्णब प्रकरणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह,गृहमंत्री अमित शहा आणि राज्यातील भाजप नेत्यांनी भूमिका मांडावी