कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी; कसा आणि कुठे मिळणार टोलपास ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी आज शनिवार पासून करण्यात येत आहे. मुंबई -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग,मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत येत्या ११ सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जाहीर केला आहे.२७ ऑगस्ट ते दिनांक ११ सप्टेंबर या कालावधीत मुंबई -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग,मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यावर कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात आली आहे.

टोलपास कुठे मिळतील ?

या टोलमाफी सवलतीसाठी “गणेशोत्सव २०२२,कोकण दर्शन अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास,त्यावर वाहन क्रमांक,चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग,वाहतूक पोलीस,पोलीस,संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे,वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत.हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल.पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.

Previous articleशिंदे गटाचे एक कॅबिनेट मंत्री आणि आमदार अडचणीत ? काँग्रेसने केली कारवाईची मागणी
Next articleमोठा निर्णय : राष्ट्रकुल स्पर्धेत पदक विजेत्या खेळांडूच्या बक्षिस रकमेत पाच पटीने वाढ