एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे!

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोल्हापुरातील खानापूर ग्रामपंचायतीवर पराभव झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे, तर महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील, असे उत्तर त्यांनी दिले आहे. आपल्याच गावातील ग्रामपंचायत न राखता आल्याने चंद्रकांत पाटील आणि भाजपसाठी हा मोठा धक्का मनाला जात आहे. मात्र चंद्रकांत पाटलांनी हा दावा साफ फेटाळून लावला आहे.

याबाबत अधिक बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, खानापूरमध्ये ६ पैकी ३ जागा आम्ही जिंकल्या आहेत. दोन जागांवर कमी मार्जिनने आम्ही पराभूत झालो आहोत. तरीही गावाने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. पंरतु केवळ एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे, तर महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील, असेही पाटील म्हणाले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीने स्वबळावर लढावे, असे आव्हान दिले आहे. चार पक्षाने वेगवेगळे लढावे, अशी मागणी आम्ही वारंवार केली आहे. यामध्ये आम्हीच नंबर वनला असू. तिन्ही पक्षाने स्वार्थासाठी एकत्र येणे. आघाडी सरकारला झेंडाही नाही आणि अजेंडाही नाही, त्यामुळे एकत्र आल्यावर हे होणारच. मात्र तरी देखील चारमध्ये आम्हीच जास्त आहोत, असा दावा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला.

कोल्हापूरमधील खानापूर हे गाव चंद्रकांत पाटील यांचे आहे.येथील ग्रामपंचायत निवडणुकीचे महत्त्व म्हणजे निवडणुकीत भाजपसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने हातमिळवणी केली होती. त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत खानापूर गावातील ही आघाडी चर्चेचा विषय ठरली होती. मात्र युती करून भाजपला ही ग्रामपंचायत राखता आली नाही. खानापूर ग्रामपंचायतीवर शिवसेनेने ९ पैकी ६ जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेच्या प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वात चंद्रकांत पाटील यांना आपल्याच गावात पराभूत व्हावे लागल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

Previous articleघासून नाय,तर विरोधकांची ठासून; ‘या’ ग्रामपंचायतींवर मनसेचा विजयी गुलाल
Next articleराज्यातील सहा हजार ग्रामपंचायतींत भाजपाला बहुमत : चंद्रकांत पाटीलांचा दावा