मुंबई नगरी टीम
मुंबई : औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.औरंगाबादचे नाव संभाजीनगर हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घोषित केले होते.मात्र साहेबांच्या आदेशापेक्षा मुख्यमंत्रीपद मोठे वाटते,अशी घणाघाती टीका राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे जाहीर केले होते. मात्र पुत्र मुख्यमंत्री असताना त्याची पूर्तता होत नाही,हे दुर्देव आहे.साहेबांच्या आदेशापेक्षा मुख्यमंत्रिपद मोठे वाटते.एकतर उद्धव ठाकरेंनी लाचारी करुन पद मिळवले. त्याही पदाचा घरात बसून वापर होत नाही. संभाजीनगर नाव जाहीर करायचे,अशी हूल देत आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली. तसेच आम्ही होतो ती शिवसेना वेगळी आहे आणि आताची शिवसेना वेगळी आहे,असा टोलाही त्यांनी लगावला.
सरकार पुढे जात नाही याला उद्धव ठाकरेच जबाबदार
मुख्यमंत्री असले तरी सरकारी यंत्रणा हाताळण्याचे ज्ञान आणि अभ्यास त्यांच्याकडे नाही. ना त्यांना खड्डे माहिती, ना राज्याची तिजोरी माहिती आहे. त्यांना गाडी कशी चालवायची हे माहित असेल, पण सरकार चालवण्याचा अभ्यास नाही. अज्ञान आहे, अशी खोचक टिप्पणी नारायणे राणेंनी केली. सरकार पुढे जात नाही. पगार होत नाहीत. याला कारण उद्धव ठाकरेच आहेत. मुख्यमंत्र्यांचा आपल्या मंत्र्यांवर अंकुश नाही. तिन्ही पक्ष वेगवेगळ्या बाजूला आहेत.शिवसेना तर पाहूच नका ते तर कलेक्टर सारखे फिरत आहेत. कलेक्शन हे एककलमी कार्यक्रम आहे. यावेळी राणेंनी सरकार पडण्याची कोणतीही तारीख न सांगता यावर अधिक बोलणे टाळणे. हे सरकार कधी पडेल हे मी सांगणार नाही. मी सांगितले तर सर्व फेल जाते. म्हणून मी काही सांगणार नाही, असे ते म्हणाले.
धान्य आणि भाज्या मातोश्रीत जाऊन विकायच्या का ?
केंद्राच्या कृषी कायद्यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विरोध दर्शवला आहे .या पार्श्वभूमीवर मुंबईत होणाऱ्या शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सहभागी होणार असल्याची माहिती आहे. यावरूनही राणेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. हे राजकीय आंदोलन असून राजकीय खेळी आहे. वर्षभरात शेतकऱ्यांच्या हिताचे एकही काम या सरकारने केलेले नाही, आता त्यांना पुळका आला आहे. ते बिल शरद पवारांनी आता वाचले असेल, यापूर्वी तेच प्रयत्न करत होते. नवीन कायद्यानुसार शेतकऱ्यांना त्यांचा माल कुठेही विकण्याची परवानगी आहे. त्यांना फायदा होणार आहे. हे चुकीचे आहे का? मग विरोध कशाला ? सगळ्या धान्य आणि भाज्या मातोश्रीत जाऊन विकायच्या का ? तो दरवाजा,पिंजरा बंदच असतो. मग विकायचा कुठे ?, असा सवाल राणेंनी उपस्थित केला.
भाजपच्या सदस्यांना फिरवायची ताकद विरोधकांमध्ये नाही
नुकत्याच झालेल्या ग्रामपंच्यात निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले, भाजपचा दावा खरा असतो आणि आहे. भाजप जी माहिती देते ती खरी असते. आम्हाला त्यासाठी हेराफेरी करायची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भाजपच्या कोणत्याही सदस्यांना फिरवायची ताकद आमच्या विरोधकांमध्ये नाही. तसे केले तर त्याचे परिणाम गंभीर होतील, असा इशाराही राणेंनी दिला.