मुंबई नगरी टीम
नागपूर : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना तीन दिवस आधीच पाकिस्तानातील बालाकोटवर झालेल्या एअरस्ट्राईक हल्ल्याची माहिती कशी? केंद्राने याबाबत उत्तर द्यावे, अशी मागणी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब असून केंद्राने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे अनिल देशमुख म्हणाले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नागपूर येथे पत्रकार परिषद घेत यासंदर्भात भाष्य केले. १४ फेब्रुवारीला २०१९ला पुलवामा हल्ला झाला. त्यानंतर २६ फेब्रुवारी २०१९ ला बालाकोट हल्ला झाला. मात्र अर्णब गोस्वामी यांना तीन दिवस आधीच म्हणजे २३ फेब्रुवारीला या हल्ल्याविषयी कशी माहिती मिळाली? असा सवाल अनिल देशमुख यांनी केला. काही दिवसांनी खूप मोठा धमका होणार आहे, असे अर्णब यांनी बार्कचे माजी सीईओ यांच्याशी केलेल्या चॅटमध्ये म्हटले असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. या हल्ल्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वातावरण बदलेल आणि मोठ्या बॉसला फायदा होईल, असे या चॅटमध्ये म्हटले आहे. यामध्ये बॉस म्हणजे दिल्लीतील मोठे बॉस असल्याचे देखील अनिल देशमुख यांनी सांगितले.
अशा हल्ल्यांविषयीची माहिती केवळ पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि सैन्य दलाच्या प्रमुखांना असते. केंद्रातील मंत्र्यांना देखील याबाबत माहिती नसते. मग असे असताना बालाकोटचा हल्ला होणार हे तीन दिवस आधीच अर्णब गोस्वामी यांना कसे माहित पडले? हा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेच्या निगडित आहे. त्यामुळे केंद्राने याबाबत उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणावरून काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अनिल देशमुख यांच्याकडे निवेदन देत अर्णब यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र यावर कायदेशीर सल्ला घेऊनच कारवाई केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.