आशिष शेलार तेव्हा तुम्ही झोपले होता का ? राष्ट्रवादीकडून सडेतोड उत्तर

मुंबई नगरी टीम

मुंबई : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनात झालेल्या हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडी आणि भाजप नेते सध्या आमने-सामने आले आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनी यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल चढवला. दिल्लीतील हिंसाचाराप्रकरणी तुमची तोंड का शिवली होती ?, असा थेट सवाल शेलारांनी शरद पवार आणि संजय राऊतांना केला होता.यावर आता राष्ट्रवादीने आशिष शेलारांना जशास तसे उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रॅास्टो यांनी ट्विटरच्या माध्यमातून आशिष शेलारांना प्रत्युत्तर दिले आहे. “जेव्हा शरद पवार काल फेसबुक लाईव्ह बोलत होते. तेव्हा आशिष शेलार तुम्ही झोपला होतात का?”, असा सवाल क्लाईड क्रॅास्टो यांनी केला. यावेळी त्यांनी शरद पवार यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादाची लिंक देखील शेअर केली “गुडमॉर्निंग आशिष शेलार, झोपेतून उठा आणि लिंक चेक करा”, असे क्लाईड क्रॅास्टो म्हणाले. यासह राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही आशिष शेलारांवर टीकास्त्र डागले. “आशिष शेलार हे भाजप व संघाचे गुलाम असून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याचे मूकपणे समर्थन करीत आहेत. दिल्लीच्या हिंसाचारा मागे भाजपचा कार्यकर्ता दीप सिद्धू असल्याचा आरोप शेतकरी का करत आहेत याचे उत्तर शेलार यांनी दिले नाही”, असा पलटवार मिटकरींनी केला. दिल्लीत काल प्रजासत्ताक दिना दिवशीच शेतकरी आंदोलनात मोठा हिंसाचार झाला. इतके दिवस शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला गालबोट लागल्याने सर्वत्र टीका होत आहे. अशातच राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि भाजप नेते एकमेकांवर निशाणा साधत आहेत.

नेमके काय म्हणाले आशिष शेलार ?

कधी काळी आवश्यक असल्यावर फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार यांनी कालच्या घटनेवर फेसबुक पोस्ट का टाकली नाही.पवारसाहेब तुमची फेसबुक पोस्ट जवान आणि पोलिसांच्या बाजूने का आली नाही ? आंदोलनात जो वावर आणि वाद पहिल्यापासून चालू आहे, त्याचे समर्थक शरद पवार आणि संजय राऊत आहेत. कालच्या घटनेवर शरद पवार, संजय राऊत तुमची तोंड आता का शिवली ?,असा खोचक सवाल आशिष शेलार यांनी केला.

Previous articleयेत्या १ फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सुरू होण्याची शक्यता
Next articleशाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची शाळेला भेट