येत्या १ फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सुरू होण्याची शक्यता

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी केव्हा सुरू होणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. नवीन वर्ष उजाडले तरी देखील मुंबई लोकल सर्वांसाठी सुरू करण्याचा मुहूर्त अद्याप निश्चित झालेला नाही. असे असतानाच आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी यासंदर्भात सूतोवाच केले आहे. २९ जानेवारी किंवा १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सुरू होण्याची शक्यता किशोरी पेडणेकर यांनी वर्तवली आहे. दरम्यान, येत्या शुक्रवारपासून मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना यासंदर्भात भाष्य केले. २९ जानेवारी किंवा १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात अंतिम निर्णय होईल. मात्र सर्वांसाठी जरी लोकल सुरू झाली तरी लोकांनी मास्क, सॅनिटायझर याचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळून खबरदारी घ्यायला हवी, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. तसेच मुंबई मनपा आयुक्तांसोबत बैठक पार पडणार असून याबाबतही चर्चा होईल, असेही त्या म्हणाल्या. सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू करण्याची तारीख पे तारीख देण्यात आल्या. मात्र मुंबईकर अजूनही या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सर्वांसाठी लोकल सुरू करण्याच्या विचाराधीन असून याबाबत त्यांनी सोमवारी एक बैठक बोलवली होती.

त्यानंतर आता येत्या शुक्रवारपासून मध्य आणि पश्चिम या दोन्ही मार्गांवरील लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेवर सध्या १५८० लोकल फेऱ्या सुरू आहेत. त्यामध्ये आता १६८५ पर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर पश्चिम रेल्वेवर सध्या १२०१ फेऱ्या असून त्यात १३०० इतकी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या तयारीच्या अनुषंगाने येत्या काही दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरू होण्याची चिन्हे आहेत. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सर्व चाचपणी करूनच सर्वांसाठी लोकल सुरू केली जाणार आहे.

Previous articleमहाराष्ट्राचा कर्नाटक व्याप्त प्रदेश पुन्हा राज्यात आणणारच ! मुख्यमंत्र्यांचा निर्धार
Next articleआशिष शेलार तेव्हा तुम्ही झोपले होता का ? राष्ट्रवादीकडून सडेतोड उत्तर