काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक, प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत बाळासाहेब थोरात काय म्हणाले !

मुंबई नगरी टीम

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. आगामी निवडणुका आणि प्रदेशाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष आजच्या बैठकीकडे लागले होते.बैठक संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पक्ष वाढवण्याची जे आवश्य आहे ते केले पाहिजे,असे थोरात यांनी म्हटले.आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आजच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली आजची बैठक पार पडली. तब्बल तीन तास चालेल्या या बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, अशोक चव्हाण यांच्यासह राज्यातील काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, आगामी निवडणुकांमध्ये काय करता येईल या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. वर्षभरात आम्ही केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्याची संधी या बैठकीच्या निमित्ताने मिळाली. निवडणुकांना सामोरे जाण्याकरता आणखी चांगल्यारितीने आम्ही कसे काम करू शकतो. संघटन कशाप्रकारे बळकट करू शकतो. याबाबत पक्षश्रेष्ठींकडून मार्गदर्शन घेतले आहे, असे थोरात म्हणाले.

यावेळी बाळासाहेब थोरात यांना प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, जो काही निर्णय करायचा असेल तो लवकर होणे गरजेचे आहे, अशी विनंती पक्षश्रेष्ठींना केली आहे. माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. यामध्ये कामाचे वाटप होत असेल एखाद्या तरुण नेतृत्वाला जबाबदारी दिली जात असेल, तर ती द्यावी, असे माझे मत आहे. शेवटी पक्ष वाढण्यासाठी जे आवश्यक आहे ते केले पाहिजे, असे सूचक विधान थोरात यांनी केले. त्यामुळे एकंदर आजच्या या बैठकीनंतरही नव्या प्रदेशाध्यक्षाच्या घोषणेसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असेच चित्र दिसत आहे.

Previous articleप्रामाणिकपणे काम करणा-या कार्यकर्त्याला नाराज करुन चालणार नाही
Next articleक्षत्रियांसाठी १० टक्के आरक्षणाचा कायदा करा….आठवलेंनी केली मागणी