मुंबई नगरी टीम
मुंबई : प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनात झालेल्या हिंसाचारावर अनेकांनी निषेध व्यक्त केला. काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर चढून धार्मिक ध्वज फडकवला होता. या प्रकारावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणातून नाराजी व्यक्ती केली होती. प्रजासत्ताक दिनी तिरंग्याच्या अपमानाची घटना दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र अशाच प्रकारचे कृत्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील केले होते, याची आठवण वचिंत बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रपतींना करून दिली आहे. संघाने १५ ऑगस्ट १९४७ साली काळा दिवस साजरा केला होता. त्याचा निषेध का करत नाही ?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.
शुक्रवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रपतींनी केंद्राच्या कृषी कायद्यांवर भाष्य केले. यासह प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनादरम्यान लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनेचा त्यांनी निषेध केला. या मुद्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत इतिहासातील एका घटनेचा दाखला राष्ट्रपतींना दिला आहे. “आदरणीय राष्ट्रपती महोदय, प्रचंड दुःख आणि खेदाने आपल्याला याची आठवण करून देणे आवश्यक आहे की, ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्याला राष्ट्रपती बनवले, त्यांना १९४९ मध्ये सरदार पटेल यांना लिहून द्यावे लागले होते की, ते तिरंग्याचा अपमान करणार नाही. आणि येणाऱ्या २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला कार्यालयावर तिरंगा ध्वज फडकावतील”
“आरएसएसने तिरंगा ध्वज तर फडकावला, पण स्वतःचा ध्वजही समान उंचीवर फडकावून आपली नियत दाखवून दिली होती. आपण ही गोष्ट विसरून गेला आहात का? आंदोलक शेतकऱ्यांनी तिरंगा खाली उतरवला नाही. तर तिरंग्याच्या उंचीपासून १५ फूट खाली शीख धर्माचा आणि शेतकऱ्यांचा झेंडा लावला, यात अपमान कुठे झाला? जर तुम्हाला हा अपमान वाटतो, तर आरएसएसने १५ ऑगस्ट १९४७ साली जो काळा दिवस साजरा केला होता. त्यांची निंदा, निषेध का करत नाही?”, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.