मुंबई नगरी टीम
औरंगाबाद : राज्यातील मराठा नेत्यांविरोधात शिवसंग्राम संघटना आक्रमक झाली असून येत्या ७ फेब्रुवारीला एल्गार पुकारणार आहे. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषद घेत आंदोलनाची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच मराठा आरक्षणाबाबत सत्ताधारी पक्षातील मराठा नेत्यांच्या भूमिकेवर विनायक मेटे हे सातत्याने टीका करताना दिसत आहेत. दरम्यान, येत्या ५ फेब्रुवारीला मराठा आरक्षणावरील सुनावणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मेटेंनी मराठा नेत्यांविरोधात एल्गार पुकारला आहे.
“गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न हा राज्य सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयात ५ फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी सुरू होत आहे. मात्र राज्य सरकारकडून या सुनावणीची आवश्यक ती तयारी अद्यापही होताना दिसत नाही. सर्व याचिकाकर्त्यांना एकत्र केले जात नाही. याचिकाकर्त्यांच्या वकिलांना एकत्र घेऊन जी स्ट्रॅटेजी बनवणे आवश्यक आहे तेही करायला सरकार तयार नाही’, अशी टीका विनायक मेटे यांनी केली आहे. अंतिरम स्थगिती असताना सरकारचे विविध मंत्री आपापल्या खात्यातील मोठमोठ्या नोकरभरती करण्याची घोषणा करत आहेत. केवळ घोषणाच नव्हे तर त्याची प्रक्रिया देखील सुरू करत आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, परिवहन मंत्री अनिल परब आदींनी आपल्या खात्यातील भरतीची घोषणा करत त्याची प्रक्रिया सुरू केली. मराठा आरक्षणावर स्थगिती आल्यानंतर विविध नोकर भरतींसाठी मंत्र्यांची चढाओढ सुरू झाली असल्याचे विनायक मेटे म्हणाले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दररोज नवनवीन जुलमी परिपत्रक काढले जाते. ज्याचा मराठा समाज आणि ओपनमधील मुला-मुलींना त्रास होईल. परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या अद्याप झाल्या नसताना नवीन परीक्षा जाहीर केल्या जात असल्याची टीका त्यांनी केली.
आमचा अंत पाहू नका
शिवसंग्राम संघटनेच्या वतीने येत्या ७ फेब्रुवारीला मराठा नेत्यांविरोधात एल्गार पुकारण्यात येणार आहे. सगळ्या मराठा समाजाने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन मेटेंनी यावेळी केले आहे. जालन्यातून या आंदोलनाला सुरुवात होईल. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात नांदेड येथे हा एल्गार मेळावा आयोजित केला जाणार आहे. पुढे नागपूरला नितीन राऊत आणि गृहमंत्री अनिल देशमुख, तर मुंबईमध्ये वर्षा गायकवाड, अनिल परब यांच्याविरोधात हा एल्गार पुकारला जाणारा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याकडे लक्ष घालावे, यासाठी बारामतीला देखील एल्गार पुकारला जाणार आहे, असे विनायक मेटे म्हणाले. ही आमची सुरुवात असून सरकारने अंत पाहू नये. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोवर एमपीएससीची परीक्षा आणि नोकर भरती पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली आहे.