मुंबई नगरी टीम
- राजीनामा ही मीडिया ट्रायलची परिणती
- आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रकार सुरू
- लवकरच ‘दूध का दूध पानी का पानी’ होईल
चंद्रपूर । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी आपला राजीनामा मातोश्रीवर पाठवा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.एकीकडे शिवसेनेच्या नेत्यांकडूनही यावर सावध प्रतिक्रिया दिली जात असताना भाजपकडून टीका टिपण्णी सुरूच आहे. यासंदर्भात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाष्य करत भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.
वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या वृत्तावर विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली.या सगळ्या प्रकरणात संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिल्याचे समजले. त्यांचा राजीनामा ही मीडिया ट्रायलची परिणती आहे. या प्रकरणात कुणाचीही कौटुंबिक तक्रार नाही.मात्र कुणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाची निपक्ष चौकशी व्हावी अशी महाविकास आघाडीची भूमिका आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. चौकशीतून जे काही सत्य समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल,असे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच केले आहे.
कुठल्याही प्रकरणात महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट आहे. असे असताना या संदर्भात प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहेत. आता महिलांसंदर्भातील विषय सांगायचे झाले तर भाजप नेत्यांची डजनभर प्रकरणे सांगता येतील. तिथे मात्र नैतिकता नीतिमत्ता संपुष्टात येते. लवकरच या प्रकरणात ‘दूध का दूध पानी का पानी’ होईल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.