काळजी न घेतल्यास नाईलाजास्तव पुन्हा लॉकडाऊन ?

मुंबई नगरी टीम

  • महाराष्ट्रासह मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढली
  •  वाढती रुग्णसंख्या ही चिंतेचीच बाब
  •  बहुतांश लोक मास्कचा वापर करत नाहीत

मुंबई । राज्यातील लॉकडाऊन हळूहळू उठवत अनेक गोष्टींना ढील देण्यात आली. अनेकांच्या मागणीनंतर कोरोनाची स्थिती लक्षात घेता मुंबई लोकलही सर्वांसाठी सुरू करण्यात आली. परिणामी महाराष्ट्रासह मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ही पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी न घेतल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊनची चिंता राज्य सरकारकडून व्यक्त केली जात असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. कोरोना नियमांचे पालन न केल्यास पुन्हा लॉकडाऊन करण्याचे संकेत महापौरांनी दिले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांनी चिंता व्यक्त केली आहे.”वाढती रुग्णसंख्या ही चिंतेचीच बाब आहे. लोकलमधून प्रवास करणारे बहुतांश लोक मास्कचा वापर करत नाहीत. लोकांनी खबरदारी घ्यायला हवी, अन्यथा आपण पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने जाऊ. लॉकडाऊन लागू करायचा की नाही हे सर्वस्वी लोकांच्याच हातात आहे,” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या की, एवढी काळजी घेऊनही रुग्णांची संख्या दुपटीने वाढायला लागली. ही संख्या जर अशीच वाढत राहिली, तर काळजीपोटी नाईलाजास्तव लॉकडाऊनच्या दिशेने जावे लागेल, अशी चिंता राज्य सरकारने व्यक्त केली आहे. बाहेर जाताना मास्क घालणे अनिवार्य आहे. कोरोनाचे नियम सर्वांनी पाळले खबरदारी घेतली तरी आपण दुसऱ्या लॉकडाऊनकडे जाणार नाही. मात्र रुग्ण संख्या वाढत राहिली तर राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला निर्णय घ्यावा लागेल, असा सूचक इशारा महापौरांनी दिला.

Previous articleभाजप नेत्यांची डजनभर प्रकरणे; कॅबिनेट मंत्र्यांने दिले आव्हान !
Next articleलॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे