लॉकडाऊन : येत्या १० दिवसांत कठोर निर्णय घेण्यास मागे पुढे पाहणार नाही !

मुबंई नगरी टीम

  • मुंबईत नियमांचे उल्लंघन
  • मुंबई महापालिकाने भरला सज्जड दम
  • वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेणार

मुंबई । मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असून राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने पाऊले उचलण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नागरिकांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र तरी देखील कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत गर्दी करणाऱ्या नागरिकांना मुंबई महापालिकाने सज्जड दम भरला आहे. महापालिका मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या १० दिवसांत कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात ट्विट केले आहे. “महापालिका मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेईल.जर रुग्णसंख्येतील वाढ कायम राहिली आणि लोकांनी कोरोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केले, तर महापालिका येत्या १० दिवसांत कठोर निर्णय घेण्यास अजिबात मागे पुढे पाहणार नाही”, असा इशारा अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिला आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा नियंत्रणात आल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र राज्य सरकारने लॉकडाउन उठवत अनेक नियमांत शिथिलता आणली. मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकलमध्ये सर्वसमान्यांना प्रवासाची सशर्त परवानगी देण्यात आली. त्यामुळे प्रवासादरम्यान लोकांची गर्दी वाढलेली दिसली. तसेच सार्वजनिक कार्यक्रम लग्न सोहळ्यातही सामाजिक अंतराचे नियम न पाळल्याचे चित्र अनेकदा दिसून आले.

परिणामी राज्यासह मुंबईत कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे.त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, सामाजिक अंतर यासारखे नियम पाळणे गरजेचे आहे. अन्यथा दुसऱ्या लॉकडाउनच्या दिशेने वाटचाल करावी लागेल, असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. दरम्यान, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल राज्याच्या विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसह बैठक पार पडली. यावेळी कोरोना संदर्भातील नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Previous articleउदयनराजे भोसलेंनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट,मराठा आरक्षणासंदर्भात झाली चर्चा
Next articleअशी बंधने शिवजयंतीलाच का आठवली ? प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला सवाल