उदयनराजे भोसलेंनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट,मराठा आरक्षणासंदर्भात झाली चर्चा

मुबंई नगरी टीम

  • मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणसंदर्भात दिले निवेदन
  • मराठा आरक्षणाच्या रखडलेल्या प्रश्नावर लक्ष घालण्याची विनंती
  • मुख्यमंत्र्यांसमोर काही प्रश्नही उपस्थित केले

मुंबई । भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. उदयनराजे भोसले यांच्या या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. मराठा आरक्षणसंदर्भात ही भेट घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाली. यावेळी उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणसंदर्भात एक निवेदनही दिले.दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या प्रकरणात शरद पवारांनी लक्ष घालावे, असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी केले होते.

मराठा आरक्षणाच्या रखडलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालण्याची विनंती यावेळी उदयनराजेंनी केली.तसेच या प्रकरणात वेळकाढूपणा, दिरंगाई होऊ नये अशा सक्त सूचना राज्य सरकारला देऊन हा विषय निकाली काढावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. यावेळी उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांसमोर काही प्रश्नही उपस्थित केल्याचे समजते.

एसईबीसी उमेदवाराने ईडब्यूएस कोट्यातून आरक्षण स्वीकारले तर सर्वोच्च न्यायालयातील केसवर काही परिणाम होणार का ?

जर मोठ्या प्रमाणावर ईडब्यूएस आरक्षण स्वीकारले तर त्याचा या केसवर काही परिणाम होणार का ?

ईडब्यूएस आरक्षण रद्दबातल ठरवले तर त्याचा मराठा समाजातील उमेदवारांवर काही परिणाम होईल का ?

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ कमिटीने सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यासंबधी जे काही निर्णय घेतले आहेत.ते समाजासमोर आले पाहिजेत.जेणेकरुन खटल्यात सरकारकडून वकिलांना नेमके काय निर्देश दिले गेले आहेत याचा खुलासा होईल.

एमपीएससीच्या माध्यमातून निवड झालेल्या २१५० उमेदवारांसाठी सुपर न्युमररी पोस्ट निर्माण करून त्यांना नोकरीत सामावून का घेत नाही ? या प्रश्नांचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केले.

Previous articleआज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे तीन महत्वाचे निर्णय
Next articleलॉकडाऊन : येत्या १० दिवसांत कठोर निर्णय घेण्यास मागे पुढे पाहणार नाही !