मुंबई नगरी टीम
- रूग्ण संख्या वाढ धोक्याचे आणि काळजीचे आहे
- प्रशासनाला गरज वाटत असेल तर लॉकडाउन
- मास्कचा वापर न करणा-यावंर कठोर कारवाई
जुन्नर । राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.अनेक ठिकाणी खबरदारी म्हणून लॉकडाऊनचा विचार राज्य सरकार करत आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी स्थानिक प्रशासनाला लॉकडाऊनची मुभा देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच यासंदर्भात रविवारी बैठक देखील होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आज शिवजयंतीनिमित्त अजित पवार हे शिवनेरी गडावर आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
“करोनासंदर्भात रविवारी बैठक होणार आहे. कोरोनाला कसे रोखता येईल याचा निर्णय बैठकीत घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्राच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली त्यात स्पष्ट सूचना दिल्या आहेत. सुरुवातीच्या काळात पॉझिटिव्हची संख्या जे डिस्चार्ज व्हायचे त्यांच्यापेक्षा कमी होती. मात्र १ फेब्रुवारीपासून काही शहरे, जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हची संख्या डिस्चार्जच्या तुलनेत वाढत आहेत. हे धोक्याचे आणि काळजीचे आहे”, अशी चिंता अजित पवार यांनी व्यक्त केली. “काल आमची कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत आम्ही १ मार्चपासून अर्थसंकल्प अधिवेशचा कार्यक्रम आखला आहे. साधारण तीन चार आठवड्याचा कार्यक्रम दिला. परंतु त्याबद्दल पुन्हा गुरुवारी चर्चा होणार आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.
लॉकडाऊन संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, “काही बाबतीच तेथील प्रशासनाला गरज वाटत असेल तर लॉकडाउन करण्याची मुभा दिली आहे. संध्याकाळी ६ ते सकाळी ६ असे करायचे असेल तर तसे करा,मात्र बाकीच्या टीमला जे कोणी मास्क वापरत नसेल तर कठोर कारवाई झाली पाहिजे असे सांगितले आहे. प्रशासनाने लोकांना पुन्हा एकदा याबद्दलचे गांभीर्य लक्षात आणून दिले पाहिजे”, असे ते म्हणाले. दरम्यान, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अमरावती, अकोला, यवतमाळ, अकोट, अचलपुर, भूर्तिजापूर आदी शहरांबद्दल निर्णय घेतल्याचेही अजित पावर म्हणाले. राज्य सरकार जी खबरदारी घ्यायला पाहिजे ती घेतच आहे.जनतेनेही आपली जबाबदारी ओळखून नियमांचे पालन केले पाहिजे,असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.