मुंबई नगरी टीम
- कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे
- मुंबई,औरंगाबाद, नागपूर, अमरावती, पुण्यात रूग्ण संख्येत वाढ
- लोकांनी खबरदारी घेतली नाही तर पुन्हा लॉकडाउन
नागपूर । राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. प्रशासनाने अनेक जिल्ह्यांत कठोर पावले उचलत दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच कठोर निर्बंधही लादले आहेत. मात्र तरीही नागरिकांना याचे गांभीर्य लक्षात येताना दिसत नाही. त्यामुळे आता सरकार राज्यात नाईट कर्फ्यूचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. आज नागपुरात ते माध्यमांशी बोलत होते.
“मुंबई, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, पुणे या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कोरोना संदर्भात अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत. कोरोनाच्या लक्षणात बदल झाल्याचे बोलले जात आहे. मात्र लक्षणविरहीत रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. कितीही सांगितले तरी लोक विना मास्क फिरताना दिसत आहेत. कुठलीही काळजी लोक घेताना दिसत नाहीत. अशावेळी काही कठोर पावले उचलावी लागणार आहेत. लोकांनी नियमांचे पालन केले नाहीतर नाईट कर्फ्यू करण्याचे विचाराधीन आहे. सायंकाळी ६ नंतर ते सकाळी ९ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यूचा विचार सुरू असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. तरीही लोकांनी खबरदारी घेतली नाही तर लॉकडाउन करावा लागेल”, असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्ह्याची परिस्थिती पाहून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी नाईट कर्फ्युचा निर्णय घ्यायचा आहे. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या आणि कोरोनाचा प्रसार पाहता काय काय उपाययोजना करता येतील त्याचे बऱ्यापैकी अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकीय नेत्यांकडून केली जाणारी आंदोलने त्यामुळे होणाऱ्या गर्दीवर देखील वडेट्टीवार यांनी भाष्य केले. कोरोनाची परिस्थिती पाहता सर्वच पक्षांनी आंदोलन करताना काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. राजकीय क्षेत्रात काम करताना अनेक कार्यक्रम, मेळाव्यांना नेत्यांना बोलावले जाते. त्यामुळे कार्यक्रमांना जाणे शक्यतो टाळले पाहिजे असेही ते म्हणाले.
शाळा पुन्हा बंद होणार
अनेक शाळांमध्ये विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यासंदर्भात विचारले असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, याबाबत पुढील आठवड्यात बैठक होणार आहे, त्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. यासह दहावी आणि बारावीच्या परीक्षाही तोंडावर आल्या आहेत. त्यावर बोलताना, परीक्षा ऑनलाइन घेण्याचा विचार सुरू होता. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे त्यावर अनेकांचे एकमत झाले नाही. त्यावर पुढील बैठकीत चर्चा होईल. तसेच येणाऱ्या अधिवेशनाच्या कालावधीबाबतही चर्चा केली जाणार आहे.
त्यातही राज्यपाल खोडा घालतील.वैधानिक विकास मंडळ बंद करून राज्य सरकार विदर्भ आणि मराठवड्याचा विकास निधी पळवत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. परंतु यामध्ये काही तथ्य नसल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. या वैधानिक विकास मंडळासंदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आहे. आता आम्ही विधान परिषदेच्या सदस्यांची १२ नावे पाठवूनही राज्यपाल त्यावर सही करत नाहीत. तर उद्या या वैधानिक मंडळावर जी माणसे नेमायची आहेत, त्यांची नावे पाठवली तर तिथेही खोडा घालतील आणि थांबवतील ही सुद्धा शक्यता आहेच. यामध्येही राजकारण आणले जाईल, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.