चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ अजब विधानाचा काँग्रेस, राष्ट्रवादीने घेतला खरपूस समाचार

मुंबई नगरी टीम

  • अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती करण्याचा निर्णयात मोदींचा सहभाग नव्हता
  • कलाम हे राष्ट्रपती झाले तेव्हा अटलजी सत्तेत होते
  • देशभक्ताला बदनाम करण्याचे पाप पाटीलांनी करू नये

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केल्याचे अजब विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या या विधानाची बरीच चर्चा रंगलेली असताना राष्ट्रवादीकडूनही यावर आता प्रतिक्रिया देण्यात आली आहे. अटलजी सत्तेत असताना अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती करण्याचा निर्णय एकमताने झाला होता. मोदींचा त्यात सहभाग नव्हता. उलट तेव्हा अटलजी मोदींना राजधर्म काय ? याचा धडा शिकवत होते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला.

नवाब मलिक यांनी यावर प्रतिक्रिया देताना यासंदर्भात भाष्य केले.अब्दुल कलाम हे राष्ट्रपती झाले तेव्हा अटलजी सत्तेत होते. अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती करण्याचा निर्णय एकमताने झाला होता. त्या निर्णयप्रक्रियेत पंतप्रधान मोदींचा सहभाग नव्हता. उलट अटलजी तेव्हा मोदींना राजधर्म काय? याचा धडा शिकवत होते, असे नवाब मलिक म्हणाले.

उद्यापासून जनता दरबारही रद्द

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकार सतर्क झाले असून खबरदारी घेतली जात आहे. मात्र असे असतानाही राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. कोरोनाचा फैलाव होत असताना सत्ताधारी पक्षाकडून मेळावे, सभा घेतल्या जात असल्याचा आरोप भाजप नेते करत आहेत. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बघूनच भाजप नेते असे बोलत असल्याचा पलटवार नवाब मलिक यांनी केला. भाजपकडून मोठ्या संख्येने राजकीय कार्यक्रम घेतले जात आहेत. उलट आम्ही उद्यापासून जनता दरबारही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउन असताना हे उघडा ते उघडा म्हणत आता उलट आरोप करण्याचा अधिकार भाजपला नाही, असेही ते म्हणाले.

…तोवर मोदी सरकार टिकणार नाही

अमित शाह सांगतात की लसीकरणानंतर सीएए, एनआरसी कायदा लागू केला जाईल. पण ज्या गतीने लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे ते पाहता हा कार्यक्रम आणखी ५ वर्षे पूर्ण होणार नाही. येत्या काळात पश्चिम बंगाल, आसामच्या निवडणुका असल्याने अमित शाह असे विधान करत आहेत. लसीकरण संपेपर्यंत मोदी सरकार टिकणार नाही, असा दावाही नवाब मलिक यांनी केला.

देशभक्त एपीजे अब्दुल कलामांना बदनाम करण्याचे पाप चंद्रकांत पाटलांनी करु नये

राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती केले हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे विधान हास्यास्पद आहे. चंद्रकांत पाटील यांनी ‘साठी बुद्धी नाठी ही म्हण सार्थक करून दाखवली आहे. एपीजे कलाम यांचे देशासाठीचे योगदान लक्षात घेऊन तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात ते सर्वसंमतीने राष्ट्रपती झाले होते. त्यांची निवड नरेंद्र मोदींनी केली होती असे म्हणून एका देशभक्ताला बदनाम करण्याचे पाप पाटील यांनी करू नये, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा समाचार घेताना लोंढे पुढे म्हणाले की, वाजपेयी यांनी गोध्रा दंगलीनंतर नरेंद्र मोदींना राजधर्माचे पालन करण्याचा आदेश दिला होता पण तो त्यांनी न पाळता मूठभर लोकांसाठी काम केले. कलाम यांनी देशाला २०२० मध्ये जागतिक महासत्ता करण्याचे स्वप्न दाखवून एक कार्यक्रमही दिला होता पण नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या विचारांनाच तिलांजली दिली. कोणत्याही गोष्टीचे श्रेय नरेंद्र मोदींना देण्याचा भाजपा नेत्यांचा आटापीटा असतो तेच पाटील यांनी केले पण वस्तुस्थिती लोकांना माहिती आहे, असेही लोंढे म्हणाले.

Previous articleराज्यात नाईट कर्फ्यू लागणार ? खबरदारी घेतली नाही तर पुन्हा लॉकडाउन !
Next articleआगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना,राष्ट्रवादी एकत्र;काँग्रेसचा स्वबळाचा नारा ?