आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना,राष्ट्रवादी एकत्र;काँग्रेसचा स्वबळाचा नारा ?

मुंबई नगरी टीम

  • पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढण्याचे सूत्र ठरले
  • एकत्र निवडणुका लढण्याने काय बदल होतो,याची प्रचिती
  • ज्या शहरात ज्या पक्षाची ताकद आहे,त्यांनी पुढाकार घ्यावा

पुणे । राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांची तयारी ही आतापासूनच सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज महत्त्वाचे विधान केले. आगामी पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढण्याचे सूत्र ठरले आहे.शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहील. तर काँग्रेसलाही त्यात कसे सामावून घेऊ याबाबत चर्चा करू, असे सूतोवाच संजय राऊत यांनी केले. आज पुण्यात ते बोलत होते.

एकत्र निवडणुका लढण्याने काय बदल होतो, याची प्रचिती महाविकास आघाडीला विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघ आणि ग्रामपंचायत निवडणुकीत आला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत हेच सूत्र अवलंबले जाण्याचे संकेत आज संजय राऊत यांनी दिले. एकत्र लढणे हे सत्ता परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. ज्या शहरात,ज्या पक्षाची ताकद आहे, त्यांनी पुढाकार घ्यावा. मुंबई, कल्याण-डोंबिवली, संभाजीनगर, नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे. त्या तुलनेत इतर पक्षांची ताकद कमी आहे असे संजय राऊत म्हणाले.

यासह पुणे, पिंपरी- चिंचवड अशा काही महापालिकेत राष्ट्रवादीची ताकद शिवसेनेपेक्षा जास्त आहे.पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुका एकत्र कशा लढायच्या याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबर चर्चा करु,अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. दरम्यान,स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेस पक्षाची यावर काय भूमिका असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Previous articleचंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ अजब विधानाचा काँग्रेस, राष्ट्रवादीने घेतला खरपूस समाचार
Next articleभाजपाचा “तो” पदाधिकारी बांगलादेशीच,तपासात आले सत्य समोर : गृहमंत्री