इतिहासात घडले नाही,ते मोदींच्या कार्यकाळात घडणार! अशोक चव्हाणांचे टीकास्त्र

मुंबई नगरी टीम

  • अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर जोरदार तोफ डागली
  • पेट्रोलच्या दराचे शतक अवघे ९० पैसे दूर
  • भारताच्या इतिहासात जे कधीही घडले नाही

मुंबई । पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत सलग बाराव्या दिवशी वाढ झाल्याने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर जोरदार तोफ डागली आहे. भारताच्या इतिहासात जे कधीही घडले नाही, ते आता मोदी सरकारच्या कारकिर्दीत घडणार असल्याचे दिसते आहे. महाराष्ट्रात पेट्रोलच्या दराचे शतक अवघे ९० पैसे दूर आहे, असे ट्वीट करून त्यांनी या दरवाढीचा निषेध नोंदवला.

अशोक चव्हाण गेले काही दिवस दररोज महाराष्ट्रातील पेट्रोलचे वाढते दर ट्वीट करून पेट्रोलची शंभरी जवळ आल्याचे उपरोधिक स्वरूपात निदर्शनास आणून देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीसाठी मागील केंद्र सरकारांना जबाबदार ठरवले होते. त्यालाही चव्हाण यांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्याबाबत केलेल्या आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी नमूद केले होते की, एप्रिल २०१४ मध्ये कच्च्या तेलाची किंमत ११० डॉलर असताना मुंबईत पेट्रोल ८० अन् डिझेल ६३ रूपयांना मिळत होते. आज कच्चे तेल ६५ डॉलरला असताना मुंबईत पेट्रोल ९६.३० तर डिझेल ८७.३० रूपयांवर आहे. यासाठी केवळ मोदी सरकारची नफेखोरी कारणीभूत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त होत असताना मोदी सरकारने सतत कर वाढवले. सर्वसामान्यांच्या खिशावर तब्बल २० लाख कोटी रूपयांचा डल्ला मारला. तेच पंतप्रधान आज पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीसाठी यापूर्वीच्या सरकारांना जबाबदार धरतात, हे हास्यास्पद आहे.

Previous articleभाजपाचा “तो” पदाधिकारी बांगलादेशीच,तपासात आले सत्य समोर : गृहमंत्री
Next articleमानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे