शरद पवारांना ईडीची नोटीस आली आणि राज्यात ‘गेमचेंज’ झाला

मुंबई नगरी टीम

  • मोदी मन की बात’ मधून भाषण चांगलं करतात परंतु कृती काहीच नाही
  • कोविड काळात खासदारांचा १२ कोटींचा निधी कापला
  • जनता पवार साहेबांच्या पाठी खंबीरपणे उभी राहिली

अंबरनाथ । ‘मन की बात’ मधून एक फोन करा असं मोदी सांगतात परंतु प्रत्यक्षात फोन केल्यावर पंतप्रधान कार्यालयाचा फोन उचलला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. मोदीसाहेब ‘मन की बात’ मधून किंवा भाषणात चांगलं – चांगलं बोलतात परंतु कृती काहीच करत नाहीत अशी टिका करतानाच काहींच्यासाठी मोदींचे अश्रू निघतात परंतु माझ्या आंदोलन करणा-या शेतकऱ्यांसाठी निघत नाहीत यावरून मोदींचे अश्रू कुणासाठी आहेत हे लक्षात येते असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अंबरनाथ येथे कार्यकर्ता मेळाव्यात केला.

कोविड काळात खासदारांचा १२ कोटींचा निधी कापला.आम्ही कोविड काळ असल्याने मान्यही केले मात्र मोदींनी संसदेच्या नवीन इमारतीचे काम सुरू केले. तोच निधी एखाद्या हॉस्पिटल उभारणीसाठी वापरला असता तर आम्हाला चांगलं वाटलं असतं. ज्याची गरज नसताना का हा उपद्व्याप असा सवाल करतानाच हे केंद्र सरकार असंवेदनशीलतेने चालत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला.अंबरनाथ भागातील रस्त्यांची अवस्था चांगली आहे कारण हे रस्ते आमचे सरकार असताना झाले आहेत. याअगोदर या देशात काहीच झालं नाही की कसली उभारणी झाली नाही जी सहा वर्षांत झाली असे केंद्र सरकार सांगत आहे. अंबरनाथ भागातील कंपन्या मागील पाच वर्षात बंद पडल्या परंतु नवीन कंपन्या आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला नाही. केंद्र सरकारने कामगारांच्या विरोधात कायदा केला आहे. जो तुमच्या आमच्या मुलांच्या मुळावर उठणार आहे याची आठवणही सुळे यांनी यावेळी करून दिली.

पवारांना ईडीची नोटीस आली आणि राज्यात गेमचेंज झाला. यावेळी महाराष्ट्रातील जनता साहेबांच्या पाठी खंबीरपणे उभा राहिला त्या जनतेचे खासदार सुळे यांनी विशेष आभार यावेळी मानले शिवाय साताऱ्याच्या पावसातील सभेने महाराष्ट्राचे चित्र बदलले याची आठवण खासदार सुळे यांनी करुन दिली. पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षासोबत राहिला त्याचा मानसन्मान नक्कीच केला जाईल. राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन जो एकटा लढत होता त्याचाही मानसन्मान १०० टक्के करणार असा शब्द सुळे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

Previous articleकोरोना इफेक्ट : ‘या’ जिल्ह्यातील शाळा,महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद
Next articleपक्ष संघटना मजबूत करण्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भर; जिल्हा कमिटीच्या बैठका घेणार