पक्ष संघटना मजबूत करण्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भर; जिल्हा कमिटीच्या बैठका घेणार

मुंबई नगरी टीम

  • इंधन दरवाढीविरोधात आंदोलन व जनजागृती मोहिमेची रणनिती ठरवणार
  • पक्ष संघटना बळकटीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठका
  •  पक्ष संघटना बांधणीवर भर देणार

मुंबई । महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि. २३ फेब्रुवारी रोजी प्रदेश काँग्रेसच्या निवड मंडळाची (पार्लमेंटरी बोर्ड) बैठक महिला विकास महामंडळ, नरिमन पाईंट येथे होणार आहे. या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. शेतकरी विरोधी काळे कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात आंदोलन व जनजागृती मोहिम राबविण्याबाबतही या बैठकीत रणनिती ठरवली जाणार आहे.

या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील,विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह निवड मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील आगामी ५ महानगरपालिका तसेच ९८ नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बांधणीसंदर्भात प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. नवी मुंबई शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, दुपारी १२ वा. कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, दुपारी २ वाजता वसई विरार जिल्हा काँग्रेस कमिटी व दुपारी ४ वा कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक घेतली जाणार आहे. तर गुरुवार दिनांक २५ रोजी औरंगाबाद ग्रामीण व शहर, भंडारा, गोंदिया व ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक होत आहे. शुक्रवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी यवतमाळ, चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक घेऊन संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला जाणार आहे तर संध्याकाळी ४ वाजता भिवंडी येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

Previous articleशरद पवारांना ईडीची नोटीस आली आणि राज्यात ‘गेमचेंज’ झाला
Next articleलॉकडाऊन करायचा की नाही ? राज्यातील जनतेला ८ दिवसांचा अल्टिमेटम