५ वर्षात १५ हजार हिंदू मतदार कमी तर १२ हजार मुस्लीम मतदार वाढले !

मुंबई नगरी टीम

मुंबई । मागील १० वर्षांपासून मालाडच्या मालवणी भागात हिंदू धर्मीयांवर इतर धर्मीयांच्या दबाव,दहशतीमुळे हिंदूंचे सातत्याने पलायन होत असून,मतदार यादीनुसार गेल्या ५ वर्षात १५ हजार हिंदू मतदार कमी झाले आहेत तर १२ हजार मुस्लीम मतदार वाढले आहेत. मालवणी भागात रोहिंग्या मुसलमान,बांग्लादेश व पाकिस्तानातून आलेल्या मुस्लीम नागरिकांना बेकायदेशीररित्या आश्रय दिला जातो आहे असा आरोप भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केला आहे.

विधानसभेत पुरवण्या मागण्यावरील चर्चेत भाग घेताना भाजपचे आमदार मंगल प्रभात लोडा यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधत,हिंदू पलायनाविरोधात आवाज उठवला.मागील १० वर्षांपासून मालाडच्या मालवणी भागात हिंदू धर्मीयांवर इतर धर्मीयांच्या दबाव,दहशतीमुळे हिंदूंचे सातत्यानं पलायन होत आहे. यावर आमदार मंगल प्रभात लोढा म्हणाले की,मतदार यादीनुसार गेल्या ५ वर्षात १५ हजार हिंदू मतदार कमी झाले आहेत तर १२ हजार मुस्लीम मतदार वाढले आहेत. मालवणी भागात रोहिंग्या मुसलमान, बांग्लादेश व पाकिस्तानातून आलेल्या मुस्लीम नागरिकांना बेकायदेशीररित्या आश्रय दिला जातो आहे.तसेच त्यांच्यामार्फत ड्रग्सचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचा आरोप आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केला.

मंगल प्रभात लोढा म्हणाले की, मालवणीच्या छेडानगरमध्ये १०८ हिंदू कुटुंब वास्तव्यास होते; मात्र आता फक्त ६० हिंदू रहिवासी उरले आहेत. हिंदू कुटुंबाच्या मोकळ्या जागेवर जबरदस्ती मुस्लीम धर्मीयांकडून अतिक्रमण करुन मशीद बांधण्यात आली. नमाजाच्या वेळेस व्यत्यय येऊ नये यासाठी महिला सार्वजनिक शौचालयात गेल्यावर बाहेर कड्या लावण्याचे धक्कादायक प्रकार सुरू आहेत.मंगल प्रभात लोढा यांनी स्थानिक प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, मालवणी भागातील पोलीस स्थानकात यासंबधित तक्रार दाखल आहेत मात्र एकाही तक्रारीची दखल पोलिसांकडून घेण्यात आलेली नसल्याचं आमदार मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. हिंदू पलायनाचे लोण आता मुंबईत येऊन पोहचले आहे.त्यामुळे वेळीच योग्य ती कारवाई करण्याची मागणी आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

मंगल प्रभात लोढा यांनी हिंदू पलायन विषयावरून सरकारवर जोरदार टीका केली असता अल्पसंख्याक आणि कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक व पालकमंत्री असलम शेख यांनी सरकारची बाजू मांडत लोढा यांच्यावर आरोप केले. मात्र लोढा यांनी प्रतिउत्तर करीत विरोधकांना सडेतोड उत्तर दिले.

Previous articleकोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची निर्मिती करा
Next articleशिक्षणमंत्र्यांची घोषणा : दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार