विधानसभेत सत्ताधारी-विरोधक भिडले ; कामकाज दिवसभरासाठी स्थगित

मुंबई नगरी टीम

मुंबई । मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत खळबळजनक दावा करीत हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनी केल्याचा संशय व्यक्त केल्याने सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.वाझे यांना निलंबित करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरल्याने सभागृहाचे कामकाज ८ वेळा तहकूब करावे लागले. या मुद्द्यावरून गदारोळ वाढतच गेल्याने कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावे लागले.

प्रश्नोत्तरांच्या तासानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मयत मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी पोलीसांना दिलेल्या जबाबातील काही मजकूर वाचून दाखवला. त्यात सचिन वाझे यांनी आपल्या पतीला अंबानी प्रकरणात अटक व्हावे म्हणून दबाव आणल्याचे म्हटल्याचे तसेच वाझे यांनीच खून केल्याचा उल्लेख असल्याचे ते म्हणाले. फडणवीस म्हणाले की,मिरा भाईंदर येथील चाळीस लाख रूपयांच्या जुन्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या धनंजय गावडे यांच्याकडे हिरेन यांचे शेवटचे लोकेशन सापडले आहे. तसेच वाझे आणि गावडे हे त्या खंडणी प्रकरणात आरोपी आहेत असा आरोप करून फडणवीस यांनी त्यामुळे वाझे यांना निलंबित करून चौकशी करावी अशी मागणी केली.फडणवीस यांच्या मागणीनंतर विरोधी पक्षाचे सदस्य आक्रमक होवून अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येवून सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी विरोधकांना प्रति आव्हान देत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात ज्या भाजपच्या नेत्यांची नावे आली आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी केली. त्यावेळी दोन्ही बाजूने सदस्य आमने सामने आले आणि घोषणाबाजी केली.देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आपल्याकडे डेलकर यांच्या सुसाईट नोटची प्रत आहे त्यात दादरा नगर हवेलीच्या प्रशासकाचा उल्लेख असल्याचे सांगितले. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी यावेळी सदस्यांना कोविडचे नियम पाळावे तसेच जागेवर बसावे अशी सूचना केली.मात्र सभागृहातील गोंधळ वाढतच गेला.तर दादरा नगर हवेली येथील सातवेळा खासदार झालेल्या मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करून चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली.याशिवाय मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके सापडल्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा मार्फत तपास सुरू असल्याचे सांगितले.त्यांच्या या घोषणेनंतर मनसुख हिरेन यांच्या हत्येला जबाबदार पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबीत करून अटक करावी आणि त्यांची चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी करीत प्रचंड घोषणाबाजी केला. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची राज्य दहशतवाद विरोधी पथकामार्फत चौकशीची घोषणा केली. या प्रकरणात कुणालाही पाठिशी घालणार नसल्याचे ते म्हणाले.

नाना पटोले यांनी यावेळी अंबानी यांच्या घराजवळ तिहेरी सुरक्षा असताना स्फोटकांची गाडी कशी पोहचली असा सवाल केला.विरोधी पक्षांच्या नेत्यांना पोलीसांकडील सिडीआर कशा मिळतात असा सवाल केला.त्यावर फडणवीस यांनी आपल्याला याबाबत अधिकार आहे विरोधकांचा आवाज असा बंद करता येत नाही असा आक्रमक पवित्रा घेतला.ते म्हणाले की याबाबत माझी चौकशी करा मी त्याला घाबरत नाही मात्र वाझे यांच्यावर कारवाई झालीच पाहीजे. यावेळी दोन्ही बाजूने नारेबाजी झाली.वाझे यांचे निलंबन झालेच पाहिजे ही मागणी विरोधकांनी लावून धरीत घोषणाबाजी सुरूच ठेवली.त्यातच उर्वरीत कामकाज पुकारण्यात आले. यावेळी शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी अन्वय नाईक प्रकरणात अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई केली त्यामुळे वाझे यांच्यावर सुडबुध्दीने आरोप केले जात आहेत असा आरोप केला.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्या प्रकणात देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईक यांच्या सुसाइड नोटनुसार कारवाई न करता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. फडणवीस यांनी देखील सरकारला आव्हान देत त्या प्रकरणात न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई केल्याचे सांगत आपण त्या प्रकरणातही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले. या मुद्यावरील गदारोळ त्यानंतरही सुरूच होता. या गदारोळातच चर्चा पुकारण्यात आली मात्र गदारोळामुळे ती होवू शकली नाही. या प्रकरमावरून सभागृहाचे कामकाज तब्बल आठ वेळा तहकूब करावे लागल्यानंतर अखेर पिठासीन अध्यक्ष अशोक पवार यानी दिवसभरासाठी कामकाज स्थगित केल्याची घोषणा केली.

Previous articleमाझ्या वडिलांनी ऊस तोडलाय,त्या व्यथा मी जाणतो : धनंजय मुंडे झाले भावूक
Next articleमराठा आरक्षणाबाबत केंद्राचा महाराष्ट्राला ‘आत्मनिर्भर’ होण्याचा सल्ला: चव्हाणांची टीका