महाराष्ट्राला बदनाम करण्याचा ठेका भाजपने घेतला आहे : नाना पटोलेंची टीका

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबई व महाराष्ट्राला भारतीय जनता पक्ष वारंवार बदनाम करण्याचे काम करत असून गुजरातच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील भाजपा नेते काम करत असून,अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणापासून पद्धतशीरपणे महाराष्ट्राच्या बदनामीची मोहीम राबविली जात आहे अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की,मुंबई व महाराष्ट्राला भारतीय जनता पक्ष वारंवार बदनाम करण्याचे काम करत असून गुजरातच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील भाजपा नेते काम करत आहेत.अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणापासून पद्धतशीरपणे महाराष्ट्राच्या बदनामीची मोहीम राबविली जात आहे.मुंबई पोलिस हे जगातील सर्वोत्तम पोलिस दलांपैकी एक असताना त्यांना खलनायक बनवले जात आहे. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मुंबई पोलिसांबद्दल जे विधान केले त्यावरून त्यांचा सर्वांकडून निषेध केला गेला.भाजपाकडून महाराष्ट्र पोलिसांचा केला जात असलेला अपमान काँग्रेस कदापी सहन करणार नाही, असा इशाराही पटोले यांनी दिला.

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.आटोक्यात आलेले कोरोनाचे संकट पुन्हा गंभीर होत आहे.महाराष्ट्रातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनला असताना केंद्र सरकार महाराष्ट्राला कोरोनाच्या लसीकरणासाठी पुरेशा लस मुद्दामहून उपलब्ध करून देत नाही हे दुर्दैवी आहे. दुसरीकडे केंद्र सरकार पाकिस्तानला कोरोना लस पुरवत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार पाकिस्तानधार्जिणे सरकार आहे, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकार हे महाराष्ट्र सरकारची वारंवार अडवणूक करत आहे.कोरोना संकट मोठे असताना पीपीई कीट, कोरोनासंदर्भातील वैद्यकीय साहित्य पुरवण्यासंदर्भातही अडथळे आणण्यात आले. महाराष्ट्र सरकारने या परिस्थितीतही कोरोनावर मात करण्यात मोठे यश मिळवले. परंतु पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. तर दुसरीकडे लसीकरणाचा कार्यक्रमही राबविला जात आहे. परंतु राज्याला आवश्यक असलेल्या प्रमाणात लस दिल्या जात नाहीत. लस पुरवण्यात केंद्र महाराष्ट्राशी दुजाभाव करत आहे. केंद्र सरकार लसीकरणाचा कार्यक्रम कसा राबवत आहे याची लवकरच आकडेवारीसह पोलखोल करणार, असल्याचे पटोले म्हणाले.

लॉकडाऊनच्या काळातील वीजबिलांसंदर्भात लोकांच्या मोठ्या तक्रारी आलेल्या होत्या. यातून लोकांना दिलासा देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. घरगुती आणि कमर्शियल विद्युत बिलाबाबतच्या धोरणावर मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. उर्जा विभागाकडून त्यांनी अहवाल मागवला असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल असे,पटोले म्हणाले.पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या प्रकरणाआडून भारतीय जनता पार्टी खासदार मोहन डेलकर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपेतर पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांना ईडी, एनआयए हे काही नवीन नाही. ज्याला कर नाही तर त्याला डर कशाला ही काँग्रेसची भूमिका असल्याने वाझे असो किंवा आणखी कुणी असो, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असेही प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Previous articleलॉकडाऊमध्ये मंत्री नितीन राऊतांचा सरकारी खर्चाने खासगी विमान प्रवास: भाजपचा आरोप
Next articleभाजपने लोकांच्या भावनांशी खेळू नये,दिशाभूल करू नये आणि खोटेही बोलू नये