मुंबई नगरी टीम
नवी दिल्ली । सचिन वाझे प्रकरणावरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरले असतानाच आता यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे.सचिन वाझे प्रकरणाचा राज्य सरकारवर परिमाण होईल,यावर आमचा विश्वास नाही,” असे पवार यांनी सांगून, महाविकास आघाडीत सर्वकाही सुरळीत असल्याचे स्पष्ट केले.
सचिन वाझे प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.वाझे यांचे निलंबन केल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महावविकास आघाडीतील महत्वाच्या नेत्यांची बैठक घेवून चर्चा केली.तर दुसरीकडे काही नेत्यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात उलथापालथ होणार असल्याची चर्चा असतानाच शरद पवार यांनी पत्रकार परिषद आयोजित केल्याने पवार यांच्या या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.या पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी वाझे प्रकरणाचा राज्य सरकारवर कसलाही परिणाम होणार नसल्याचे सांगितले.महाविकास आघाडीत कोणतीही अडचण नाही.काही अडचणी येतात,त्यावर एकत्र मिळून तोडगा काढतील, असेही पवार यांनी यांनी वेळी सांगितले.
सचिन वाझे प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. त्यावेळी त्यांना मदत करणे आमचे काम आहे.ज्या लोकांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे,त्यांना त्याची जागा दाखवणे यासाठी एनआयए तपास करणार यात काहीही चुकीचे नाही असेही त्यांनी सांगितले.राज्य सरकारने हे प्रकरण व्यवस्थित हाताळले आहे, त्यामुळे सगळे एकजूट झाले आहेत.चुकीचे काम करणाऱ्या लोकांना शोधले. त्यांचा पर्दाफाश केला आणि सक्तीने पाऊल उचलू शकतो हे दाखवून दिले,” असेही पवार यांनी सांगितले.या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदलीविषयी चर्चा सुरु आहे.यावर पवार म्हणाले की, परमबीर सिंह यांची बदली होणार आहे की नाही याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारा. कोणाच्या नियुक्ती आणि बदलीबाबत आम्हाला रस नाही.