बीड जिल्हा बँक निवडणुकीत धनंजय मुंडेंनी भाजपची मक्तेदारी मोडीत काढली

मुंबई नगरी टीम

बीड । बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या मुत्सद्दी खेळीस जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत मोठे यश मिळाले असून महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनलला ६ पैकी ५ जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष म्हणून निवडून आलेले राजकिशोर (पापा) मोदी हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत.

१९ पैकी ८ जागांवरच निवडणूक झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आघाडीने ६ उमेदवार रिंगणात उतरवले होते. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्यभान मुंडे यांच्या रूपाने धनंजय मुंडे यांचा प्रतिनिधी प्रथमच जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर निवडून गेला आहे. भाजप नेत्यांनी ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार घातला होता. परंतु माजी पालकमंत्री यांच्या आदेशाला झुगारत जवळपास ६० टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. झालेल्या मतदानापैकी ९५ टक्क्यापेक्षा अधिक मतदान हे महाविकास आघाडीला मिळाल्याचे एकूण चित्र आहे.महाविकास आघाडीचे भाऊसाहेब नाटकर (४२ मते), अमोल आंधळे (२२३ मते), रवींद्र दळवी (७२० मते), कल्याण आखाडे (७१६ मते), सूर्यभान मुंडे (७१० मते) मिळवून विजयी झाले तर गंगाधर आगे यांना ३६ मते मिळाली, याठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी ९३ मते घेऊन विजयी झाले आहेत.

दरम्यान केवळ ८ जागांवर निवडणूक होत असताना देखील जिल्हा बँकेशी संलग्न मतदारांनी महाविकास आघाडीला कौल दिला आहे. निवडणुकीवर बहिष्कार घालून, आपल्याच मतदारांवर अविश्वास दाखवत त्यांना राखण बसणाऱ्या भाजपची मक्तेदारी या निकालाने मोडीत निघाली असल्याचे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. मुंडे यांनी सर्वच नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले आहे. तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय येणाऱ्या काळात घेतले जातील, असा विश्वासही मुंडे यांनी व्यक्त केला आहे.अवघ्या काही तरुण सहकाऱ्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या धनंजय मुंडे यांचा सूर्यभान मुंडे या जिवलग सहकाऱ्याच्या रूपाने जिल्हा बँकेतील प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद या पाठोपाठ जिल्हा बँकेतील भाजपचे वर्चस्व मोडीत काढून मुंडे यांनी पुन्हा एकदा आपले नेतृत्व सिद्ध केले असल्याची चर्चा जिल्हाभरात आहे.

Previous articleसचिन वाझे यांच्या आलिशान गाड्या कुणी-कुणी वापरल्या ? ; फडणवीसांचा सवाल
Next articleआघाडी सरकारचा महाराष्ट्रात निव्वळ तमाशा ; चंद्रकांत पाटील यांचा घणाघात