गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही; शरद पवारांचा मोठा निर्णय

मुंबई नगरी टीम

नवी दिल्ली । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रानंतर राज्यातील राजकीय वातावारण ढवळून निघाले आहे.विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार घेत त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केली असून,देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही,असे पवार यांनी स्पष्ट केले.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लिहिलेल्या पत्रावर शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत,या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची पुन्हा एकदा मागणी केली आहे. परमबीर सिंह यांनी लिहिलेल्या पत्राची चौकशी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याकडून होणे अपेक्षित आहे,असेही पवार यांनी सांगितले.गृहमंत्री अनिल देशमुख आणि वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यातील भेटीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.परमबीर सिंह यांच्या आरोपामधील तारखांवेळी गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना बाधित असल्यामुळे क्वारंटाईन होते. त्यामुळे माजी आयुक्तांच्या आरोपात तथ्य नाही.असे पवार यांनी यावेळी सांगितले.हसमुख हिरेन यांच्या हत्येचा तपास एटीएसकडून योग्य दिशेने सुरू असताना, त्याची दिशा भरकटवण्यासाठी माजी पोलीस आयुक्तांनी हे आरोप केले असावेत. त्यामुळे अशा आरोपांमध्येच तथ्य नसल्याने गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची तसेच चौकशीची गरज नसल्याचे पवार यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख कोरोनामुळे रुग्णालयात दाखल असल्याचे आणि त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते क्वारंटाइन असल्याची कागदपत्रे सादर केली.अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात ५ ते १५ तारखेपर्यंत कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते.यानंतर १५ फेब्रुवारी रोजी डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते १५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान नागपुरात राहत्या घरी क्वारंटाईन होते.यामुळे परमबीर सिंह यांनी केलेले आरोप आणि वस्तुस्थिती यात मोठी तफावत आहे.देशमुख फेब्रुवारी महिन्यात कुणाला भेटण्याची शक्यताच नव्हती. हे यावरून सिद्ध झाले आहे, असे पवार म्हणाले.१५ ते २७ फेब्रुवारी पर्यंत देशमुख यांना होम कॉरेन्टाईनचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. असे असताना परमबीर सिंह कशाच्या आधारावर देशमुखांनी वाझेंना भेटून वसुलीचे आदेश दिल्याचे सांगत आहेत, असा सवालही पवारांनी केला.

परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वाझेंना बोलवले होते असे पत्रात नमूद केले आहे. त्यानंतर गृहमंत्री मला आणि मुख्यमंत्र्यांना भेटले असे लिहिले आहे. मात्र आमची भेट मार्चच्या दुस-या आठवड्यात झाली होती,असे सांगतानाच परमबीर सिंग हे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गप्प का होते ? ते आरोपासाठी महिनाभर का थांबले ? असा सवाल पवार यांनी केला.कागदपत्रावरून अनिल देशमुख हे मुंबईत नव्हतेच. ते नागपूरला होते आणि कोरोनावर उपचार घेत होते. त्यामुळे सिंग यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे उघड झाले असल्याने चौकशीचा प्रश्नच येत नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

Previous articleआघाडी सरकारचा महाराष्ट्रात निव्वळ तमाशा ; चंद्रकांत पाटील यांचा घणाघात
Next articleरूग्ण संख्येत वाढ होत राहिल्यास लॉकडाऊन ? दोन दिवसात निर्णय घेणार