शेतकरी,सलून चालक,फुल विक्रेते डबेवाल्यांसह छोट्या व्यावसायिकांना आर्थिक मदत द्या

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्य सरकारने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या पॅकेजमध्ये शेतकरी, सलून दुकानदार, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईतील डबेवाले व छोटे व्यावसायिक यांचा समावेश करण्यात आलेला नाही. कोरोनावर मात करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत हे घटकही प्रभावित होणार असल्याने त्यांच्यासाठीही पॅकेजमध्ये तरतूद करून या घटकांनाही उचित न्याय द्यावा,अशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून या पत्रात पुढे असे म्हटले आहे की,राज्यात कोरोना महामारीची भयंकर स्थिती पाहता महाराष्ट्र शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी घोषित केली आहे, त्याचे काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत आहे. लोकांचे जीव वाचविणे ही आपली प्राथमिकता असून त्यासाठी काँग्रेस पक्ष खंबीरपणे आपल्यासोबत उभा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार संचारबंदी कालावधीसाठी छोट्या व्यावसायिकांकरिता आपण पॅकेज जाहीर केले आहे, त्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीने आपले मनस्वी स्वागत आहे. मात्र या पॅकेजमध्ये अजून काही घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी काँग्रेसची आग्रही भूमिका राहणार आहे.

संचारबंदीच्या कालावधीत भाजीपाला, फळबागायती व फुलांच्या शेती व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. या कालावधीत मार्केटमध्ये मालाचा उठाव मोठया प्रमाणावर होत नाही, परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार तसेच सलूनचे दुकान बंद असल्याने या व्यावसायिकांचेही मोठे आर्थिक नुकसान होणार आहे आणि या कालावधीत सर्व धार्मिक स्थळांवर बंदी असल्याने फुल विक्रेत्यांवरही उपासमारीची वेळ येणार आहे.मुंबईतील महत्वाचा घटक असलेल्या डबेवाल्यांचाही या पॅकेजमध्ये समावेश करून या घटकांना लाभ द्यावा, असे पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.

Previous articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे केली महत्वाची मागणी
Next articleअन्यथा आम्ही लोकांना रेमडेसिवीर इंजेक्शन वाटू : प्रविण दरेकरांचा इशारा