अन्यथा आम्ही लोकांना रेमडेसिवीर इंजेक्शन वाटू : प्रविण दरेकरांचा इशारा

संग्रहित छायाचित्र

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या,रेमडेसिवीर इंजेक्शनचा निर्माण झालेला प्रचंड तुटवडा,रुग्णांची मागणी या सर्व गोष्टींचा विचार करून ज्या निर्यातदार कंपन्या महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यास तयार आहेत व ज्यांनी महाराष्ट्र शासनाकडे परवानगी मागितली आहे,अशा कंपन्यांना पुरवठा करण्यास परवानगी द्यावी, याबाबतची प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करावी व राज्यातील रुग्णांना तातडीने रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावीत,अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी अन्न व औषधी प्रशासन मंत्री,राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे.

मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर दरेकर यांनी माध्यमांना माहिती दिली की,राज्यात ५० हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याबाबतचे आश्वासन आम्ही दिले आहे.याच पार्श्वभूमीवर गुजरातच्या फार्मा कंपनीच्या मालकांची राज्याच्या आरोग्य आणि औषध प्रशासन मंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.सरकारने जर रेमडेसिव्हीरसाठी परवानगी दिली नाही तर आम्ही सविनय कायदेभंग करुन लोकांना इंजेक्शन वाटू असाही इशारा आम्ही सरकारला दिला आहे.गुजरातच्या ब्रोफ फार्मा कंपनीच्या मालकांशी आज मी चर्चा केली, एक्सपोर्टचे डिस्ट्रिब्यूटरही होते.निर्यात थांबवली असल्यामुळे तो माल आपल्या राज्यात विकायला परवानगी द्या, अशी विनंती त्यांनी केली आहे. या इंजेक्शनचे रोज २० हजार एव्हढे उत्पादन होते,असे फार्मा कंपनीच्या मालकांचे म्हणणे आहे.त्यामुळे राज्य सरकारने परवानगी दिली तर राज्यात निर्माण झालेल्या रेमडेसिव्हीरच्या तुटवड्याचा प्रश्न तातडीने मार्गी लागेल असेही दरेकर यांनी सांगितले.

सरकारच्या प्रतिसादाबाबत दरेकर म्हणाले की, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मंत्री राजेंद्र शिंगणे आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली. तेही या दृष्टीने सकारात्मक पाठिंबा देत आहेत. आज संध्याकाळी त्यांची बैठक आहे. परवानगीबाबत मी राजेंद्र शिंगणे यांना पत्र दिलेले आहेच, शिवाय गुजरात सरकारने कशा पद्धतीने परवानगी दिली, याचाही दाखला मी पत्रात दिलेला आहे. देवेंद्रजी फडणवीस यांचंही केंद्राशी बोलणं सुरु आहे. पण राज्य सरकारने पररवानगी दिली तर तातडीने पुरवठा होऊ शकतो.शिंगणे यांनी तरी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्यामुळे त्यांचा आभारी आहे.कोणत्याही अडचणी येणार नाहीत, सरकारने परवानगी दिली पाहिजे. पण जर सरकारने परवानगी दिली नाही तर सविनय कायदेभंग करुन आम्ही लोकांना या इंजेक्शनचे वाटप करु, याचीही कल्पना मी मंत्र्यांना दिली आहे.आज औषधे न मिळाल्यामुळे लोकं मरत आहेत, आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाही.ऑक्सिजन साठ्यासाठी देखील आम्ही सरकारला पूर्ण मदत करु,महाराष्ट्रातील रुग्णांसाठी जेथून मिळतील तेथून इंजेक्शन मिळवण्याचा सर्वांनीच प्रयत्न करायला हवा व सरकारनेही त्यांना साथ द्यायला हवी, अशीही भावना दरेकर यांनी व्यक्त केली.

Previous articleशेतकरी,सलून चालक,फुल विक्रेते डबेवाल्यांसह छोट्या व्यावसायिकांना आर्थिक मदत द्या
Next articleएका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यातील प्रवासासाठी ई-पासची गरज आहे का ? डिजींचा खुलासा