आमदार खासदारांना रस्त्यात आडवा,त्यांना घराच्या बाहेर फिरू देऊ नका !

मुंबई नगरी टीम

सातारा । सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर मराठा समाजाने पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला असतानाच भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे या मुद्द्यावरून आक्रमक झाले असून,मराठा समाजाने यापुढे आरक्षणासाठी आंदोलन न करता लोकप्रतिनिधांना घराबाहेर पडू देऊ नका,त्यांना रस्त्यातच आडवा,असे आदेश त्यांनी मराठा समाजाला दिले आहेत.एकीकडे या मुद्द्यावरून मराठा समाजाची माथी भडकवू नका अशी विनंती राज्य सरकारकडून केली जात असतानाच खा. उदयनराजे भोसले यांनी उघडपणे इशारा दिल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करता येणार नाही पण यानिमित्ताने कुणी महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करु नयेत.जनतेने उगाच डोकी भडकवून घेवू नये अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असतानाच,सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द ठरवल्यानंतर पहिल्यांदाच भाजपचे राज्यसभा सदस्य खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा जरी असला तरी राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे सांगतानाच, वेगवेगळ्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी आतापर्यंत आपली भूमिका का स्पष्ट मांडली नाही ? असा सवाल त्यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना केला आहे.मराठा समाजाने यापुढे आरक्षणासाठी आंदोलन न करता त्यापेक्षा आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना रस्त्यात आडवा आणि त्यांना घराच्या बाहेर फिरू देऊ नका,असा आदेश मराठा समाजाला दिला आहे.

फडणवीस सरकारनेही आरक्षणासाठी जोमाने बाजू मांडून उच्च न्यायालयाच्या माध्यमातून आरक्षण पारित झाले होते.ठाकरे सरकारनेही जोमाने बाजू मांडली.केंद्र सरकारलाही यामध्ये आणले होते. जे शक्य होईल ते सर्व दोन्ही सरकारने केले होते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आपण जास्त काही बोलू शकत नाही,कोणी कमी पडले असे मी म्हणणार नाही.सर्वांनी आपली बाजू चांगली मांडली आहे.उद्रेक होऊ नये या मताचा मी आहे. करोनाची महामारी सुरु असताना, माणसे मरत आहेत.सध्या आपली माणसे जगली पाहिजेत याकडे लक्ष दिले पाहिजे. कोणी उद्रेक शब्दही काढू नका,अशी विनंती भाजपचे राज्यसभा सदस्य खासदार संभाजीराजेंनी मराठा समाजाला केली आहे.मात्र आज खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मराठा समाज यावर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Previous articleरुग्णांसाठी वरदान : दिवसाला सुमारे ५३ मेट्रीक टन हवेतून ऑक्सिजनची निर्मिती
Next articleनितीन गडकरींचे धडाकेबाज काम : गोरगरीबांना सरकारी दरात रेमडीसीवीर उपलब्ध होणार