तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे सकाळपासूनच “वर्क फ्रॅाम-मंत्रालय”

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा,बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.मंत्रालयात उपस्थित राहून उपमुख्यमंत्री पवार यांचे सकाळपासून वादळ परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे.त्यांनी प्रशासनाला बचाव कार्यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही यावेळी दिले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी सिंधुदुर्ग,रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली तसेच बचाव व मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली.सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.उपमुख्यमंत्री पवार मंत्रालयात उपस्थित राहून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून राज्यातील वादळ परिस्थितीवर व्यक्तीश: लक्ष ठेवून आहेत. तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.

Previous articleसंपूर्ण देश एकजूट,किती लोकांना अटक करताय बघुया..नवाब मलिक यांचे भाजपला आव्हान
Next articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे “वर्क फ्रॅाम-मंत्रालय” कधी करणार ? भाजपचा सवाल