तर कोकणवासी तुम्हाला कोल्हापुरी चप्पल दाखवल्याशिवाय राहणार नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई । भाजपाच्या दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या टीकेचा समाचार विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी घेतला.मलिकांनी लोकांचे बूट पाहण्यापेक्षा कोकणात जाऊन तेथील परिस्थिती पहावी.कोकणाला जर मदत सरकारने केली नाही तर कोकणवासी तुम्हाला कोल्हापुरी चप्पल दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असा टोला दरेकर यांनी लगावला.

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरीता गेल्या तीन दिवसांपासून कोकण दौऱ्यावर होते.आज दौरा संपल्यानंतर दरेकरांनी मुंबईत भाजपा पत्रकार परिषद घेवून सरकार आणि नवाब मलिक यांचा समाचार घेतला.दोन्ही विरोधी नेते एकसारखेच बूट घालत आहेत. बूट एकसारखे घालतात, बूट खरेदी करतात, बूट नवे खरेदी करावे लागतात यांचे बूट नायकिचे कि पुमाचे हे ठाऊक नाही पण दौऱ्यावर नटून जात आहे, दौऱ्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार नसल्याचे राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी निशाणा साधला.त्याबाबत दरेकर म्हणाले की, बूट घातले की सूट घातले हे पाहण्यापेक्षा, आम्हाला अधिकार सांगण्यापेक्षा मंत्र्यांनी घरातून बाहेर यावे. मलिकांनी बूट पाहण्यापेक्षा कोकणात जावे. कोकणाला जर मदत केली नाही तर कोकणवासी तुम्हाला कोल्हापुरी चप्पल दाखवल्याशीवाय राहणार नाही, अशी टिका दरेकर यांनी केली.

कोकणातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर हे लक्षात येते की,नुकसान फार मोठे आहे, अनेक कोटींचे नुकसान झाले,पण पंचनाम्यामध्ये २० ते २५ लाख रुपयांचेच नुकसान झाल्याचे दाखवले जात आहे. कोकणवासीय सरकारकडे डोळा लावून बसले आहेत. त्यामुळे सरकार कडून भरघोस मदतीची अपेक्षा आहे. सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी मदत करण्यापेक्षा निकष बाजूला ठेऊन प्रत्येक झाडामागे मदत करण्याची आवश्यकता आहे. बोटी पुन्हा चालवण्यायोग्य होतील यासाठी येणारा खर्च द्यावा लागेल, नुकसानग्रस्त घराला जी नियमात असणारी मदत आहे ती अपुरी आहे, त्यातही वाढ करावी लागेल, एकूणच नियम, कायदे, निकष बाजूला ठेऊन मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला तरच कोकणवासीयांना दिलासा मिळेल, तशा प्रकारचा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी दरेकर यांनी केली.

कोकणाने सेनेला भरपूर दिलं, ग्रामपंचायतीच्या सरपंचांपासून अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत वैभवाचे दिवस सेनेला आले त्यामध्ये कोकणातील जनतेचा सिंहाचा वाटा आहे.किंबहुना शिवसेनेला हे दिवस कोकणवासीयांमुळेकच दिसले.असे असले तरी निसर्गवादळात झालेल्या नुकसानीची भरपाई मुख्यमंत्री अजून देऊ शकले नाहीत, मच्छीमार, फळबागायतदार, घरांचे लाभार्थी अजूनही मदतीची प्रतीक्षा करीत आहेत. आज पुनः चक्रीवादळामुळे कोकण उद्ध्वस्त झाले असताना मुख्यमंत्री आणि सरकारी यंत्रणा कोकणात आली, उतरली आणि पुनः मुंबईला परतली. यामधून कोकणवासीयांचे कोणते समाधान केले, असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला.मुख्यमंत्र्यानी कोकण दौऱ्यात मोदीजींकडून मदतीची अपेक्षा केली आहे. त्याबाबत बोलताना दरेकर म्हणाले, तौक्ते चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. झाडं कोलमडली असून, घरांची छप्परं उडाली, आंबा आणि काजूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, बोटी बुडाल्या आहेत. कोकणवासी बेजार झाला आहे आणि दुसरीकडे मुख्यमंत्री केंद्रावर टिका करत आहेत. आमचा त्याना प्रश्न आहे. तीन तासाच्या दौऱ्यातुन तुम्ही काय साध्य केलं ? कोकण दौऱ्यात मुख्यमंत्री यांनी कोणतीही घोषणा केली नाही. त्यांनी हा दौरा केला त्यापेक्षा त्यांनी वर्षा बंगल्यावर आढावा बैठक घेऊन निर्णय घ्यायला हवे होते, असा टोला दरेकर यांनी लगावला.

मुख्यमंत्री ठाकरे आज कोकणच्या दौऱ्यावर निघाले आहेत. वादळाने लोकांच्या चुली भिजल्या आणि विझल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्कीच विझलेल्या चुली पेटविण्याचे बळ देतील, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांनी चुली बघितल्या नाही तर चुली कशा पेटवणार, रस्त्यावर किंवा विमानतळावर चुली नसतात असा टोला लगावत सरकारच्या करणीत आणि कथनीत फरक दिसून येत असल्याच दरेकर यांनी सांगितले.

Previous articleपंतप्रधानांनी महाराष्ट्र किंवा कोणत्याही राज्याच्या बाबतीत भेदभाव केलेला नाही
Next articleधक्कादायक: ठाकरे सरकारने राज्यपालांकडे पाठवलेल्या ‘त्या’ १२ नावांच्या यादीचे काय झाले ?