आमची मैत्री पिंजऱ्यातील नव्हे जंगलातील वाघाशी;चंद्रकांत पाटलांनी सेनेला डिवचले

मुंबई नगरी टीम

पुणे।आगामी महानगरपालिका निवडणुकीत लोक मुंबईत शिवसेनेला धडा शिकवतील असे सांगतानाच,आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते.पिंजऱ्यातील वाघाशी नाही.वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता तोपर्यंत दोस्ती होती.आता तो पूर्णपणे पिंजऱ्यामध्ये आहे,अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे नाव न घेता डिवचले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिल्यास आम्ही वाघाशी मैत्री करायला तयार आहे,असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते.तर चंद्रकांतदादा गोड माणूस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशा शुभेच्छा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्या आहेत. त्यावर पाटील यांनी शिवसेनेला डिवचत,आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते.पिंजऱ्यातील वाघाशी नाही.वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता तोपर्यंत दोस्ती होती.आता तो पूर्णपणे पिंजऱ्यामध्ये आहे,अशा शब्दात त्यांनी समाचार घेतला आहे.पाटील पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.भारतीय जनता पार्टीच्या विरोधात राज्यातील सत्ताधारी तीन पक्ष एकत्र असले तरीही आगामी महानगरपालिका,नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजपा स्वबळावर जिंकेल इतके मजबूत पक्ष संघटन निर्माण करणे हा आपला संकल्प आहे. भाजपा आज राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. भाजपाच्या विरोधात सत्ताधारी आघाडीचे तीन पक्ष एकत्र असूनही भाजपाने पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जिंकली. त्याच पद्धतीने साडेसहा हजार ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळविला. पक्षाचे संघटन मजबूत आहे, ते आणखी मजबूत करणार आहोत असेही पाटील म्हणाले.

मुंबईत बुधवारी पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून लोकांचे प्रचंड हाल झाले. त्याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, मुंबई महानगरपालिकेत गेली वीस वर्षे शिवसेनेची सत्ता आहे आणि गेली दीड वर्षे राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प चाळीस हजार कोटी रुपयांचा आहे. तरीही लोकांचे शहरात हाल होत आहेत. आता तर मुंबईत असुरक्षित वाटू लागले आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत लोक मुंबईत शिवसेनेला धडा शिकवतील असेही पाटील यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशानुसार समाजातील वंचितांसाठी शक्य तेवढे काम करण्याचा आपला सामाजिक संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील वंचित घटकांतील १,३२० जणांना खासगी रुग्णालयात कोरोना लस घेण्यासाठीची मोफत कुपन देण्यात आली. तसेच मतदारसंघातील तीन हजार रिक्षाचालकांना सीएनजी इंधनासाठी प्रत्येकी एक हजार रुपयांची कुपन देण्यात येत आहेत. त्यापैकी अडीच हजार रिक्षाचालकांना गुरुवारी वाटप करण्यात आले. मतदारसंघातील वीस हजार मुलींना शिलाईसह ड्रेसचे कापड देण्यात येणार आहे. कोरोनाचा आर्थिक फटका बसलेल्या छोट्या व्यावसायिकांना दहा हजार ते पन्नास हजार रुपये कर्जाच्या स्वरुपात मदतही करण्यात येणार आहे.

Previous article७० हजार रिक्षाचालकांच्या खात्यात रक्कम जमा;अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन
Next articleशेतक-यांसाठी आनंदाची बातमी: ‘या’शेतक-यांना शून्य टक्के दराने कर्ज मिळणार