५ वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील,या संजय राऊतांच्या वक्तव्यात आत्मविश्वासाचा अभाव

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रीपदासाठी आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा असतील.पण महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष टिकलं तर मुख्यमंत्री पदासाठी ‘वाटा’ कि ‘घाटा’ असा प्रश्न निर्माण होईल. कारण, आताच राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपला मुख्यमंत्री व्हावा म्हणून पॅड बांधून आहेत. मुख्यमंत्री पदाची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सुप्त भावना आणि नाना पटोले यांची इच्छा लपून राहिलेली नाही.त्यामुळे ५ वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील,या संजय राऊतांच्या वक्तव्यातून आत्मविश्वासाचा अभाव दिसून येतो,असा पलटवार विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील राजकारण वेगळं आहे,येथे टोकाची भूमिका नसते,असं सांगून चंद्रकांत पाटील यांना संजय राऊत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.यावर बोलताना दरेकर म्हणाले,संजय राऊत बोलतात त्याप्रमाणे त्या गोष्टी आचरणात येताना दिसत नाही. खरं तर टोकाचं राजकारण आपल्या वक्तव्यांमधून प्रसार माध्यमांमार्फत कुणी नेलं असेल तर संजय राऊत यांनीच नेलं आहे.पक्ष विचारधारा आणि वैचारिक बैठक बदलतो तेव्हा सत्तेचा क्षणिक फायदा होतो. परंतु येणाऱ्या काळात सोडलेल्या विचारांची किंमत मोजावी लागते.राजकारण चंचल असतं,असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. या चंचल राजकारणाचा फायदा भाजपा करून घेणार का, यावर दरेकर म्हणाले, राजकारण कधीच चंचल नसतं,राजकीय नेते चंचल असतात,त्यामुळे राजकारण चंचल होताना दिसतं. एकवेळ राजकारण चंचल झालेलं. पण आपली विचारधारा चंचल झाली तर फार अडचण होते.कोणत्याही पक्षाचा पाया हा स्वीकारलेली विचारधारा आणि वैचारिकता हा असतो. राजकारण चंचल झालं,यापेक्षा आपली विचारधारा विचलित झाली, चंचल झाली का,याचा विचार आणि त्यादृष्टीने आत्मपरीक्षण केलं पाहिजे.

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची पताका अटकेपार फडकवली. पण मविआ बनवल्यापासून किंबहुना बनवण्याआधी अटी आणि शर्थी मान्य कारेपासून पक्षाची मूळ विचारधारा शिवसेनेने बदलली आणि ती महाराष्ट्रातील जनतेला दिसून आली आहे. अनेक वैचारिक गोष्टी शिवसेनेने सत्तेपोटी बाजूला ठेवल्या आहेत. निश्चितपणे आपली विचारधारा, वैचारिकपणा बदलतो तेव्हा सत्तेचा क्षणिक फायदा होतो. परंतु येणाऱ्या काळात सोडलेल्या विचारांची किंमत मोजावी लागते असेही दरेकर म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत दिल्लीत एवढी मोठी बैठक होऊन सुद्धा मराठा आरक्षणाचा प्रश्‍न हा केंद्र सरकारच्याच अखत्यारीत आहे, त्यामुळे संभाजी राजांनी दिल्लीत आंदोलन करावं, अशी सूचना महाविकास आघाडीने केली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले, संभाजीराजे यांच्याबाबतची भूमिका महाविकास आघाडीने आता बदलली. अगोदर हेच लोक संभाजीराजांबाबत सकारात्मक भूमिका घेत होते. आता त्यांना दिल्लीला आंदोलन करण्यास सांगत आहेत. मराठा आरक्षणाच्या आपल्या कर्तव्यापासून, जबाबदारीपासून दूर पळण्याचा हा उत्तम मार्ग, जो सर्वच प्रश्नात माविआ घेते आणि केंद्र सरकारवर ढकलते,ते याही बाबतीत त्यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत प्रॉपर प्रोसेस पूर्ण करण्याची जबाबदारी राज्याची असताना इतर १४ – १५ विषयात मराठा आरक्षण घुसवत पंतप्रधानांची भेट घेऊन आम्ही आमची जबाबदारी पार पाडली, अशा प्रकारचे दिखाऊपणा राज्यसरकार करीत आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.

महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा मतभेद नाही, असे एकीकडे बोलले जात असताना आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याचे नारे दिले जात आहेत. याबाबत मत व्यक्त करताना दरेकर म्हणाले, माविआ मतभेद नाहीत, असं भासवत असताना रोज वेगवेगळ्या विषयांवर मतभेद जगजाहीर होत आहेत आणि ते जनता पाहते आहे.राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदाची इच्छा आहे, दुसऱ्या बाजूला ५ वर्ष आमचाच मुख्यमंत्री राहील,अशी शिवसेनेची भूमिका आहे,नाना पटोले यांनीही आपली इच्छा लपवून ठेवलेली नाही.खरं तर भाजपला असलेला टोकाचा विरोध, भाजपाला मिळणारा जनाधार, जनतेचा पाठिंबा या गोष्टी रोखण्यासाठी इच्छा असो व नसो, मजबुरी म्हणून ते एकत्रित असल्याचा आव आणत आहेत. परंतु, आतून आघाडी पूर्णपणे पोखरलेली आहे, ही आघाडी कधी कोसळेल सांगता येत नाही.शिंदे आणि अजित पवार यांच्या भेटीवर अशा गुप्त भेटी मानत नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. यावर बोलताना दरेकर म्हणाले, हे सरकारच गुप्त भेटीवर चाललेलं आहे. यांच्या भूमिका चंचल असतात. अमित शहा यांच्यासोबत दरवाजाआड चर्चा झाली, त्या गुप्त बैठकीचं भांडवल किंबहुना राजकारण करून शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीशी सोयरीक केली. सोयीप्रमाणे गुप्त भेटीचं अवडंबर करायचं आणि दुसऱ्या बाजूला गुप्त भेटीला आम्ही मानत नाही, अशाप्रकारची दुहेरी भूमिका राऊतांची दिसून येते.

स्वाभिमानावर चालणारा पक्ष शिवसेना होता, याची जाणीव आणि भान अजून आहे, याबद्दल मी अभिनंदन करतो. कारण, अलीकडच्या काळात मविआमध्ये स्वाभिमान गहाण ठेवत शिवसेनेची होणारी फरफट आपण वारंवार पाहिली आहे.याची अनेक उदाहरणे आहेत. खेड पंचायत समितीमध्ये सभापती शिवसेनेचा असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अविश्वास आणला आणि शिवसेनेचं सभापतीपद घालवलं. एका बाजूला सन्मानाच्या गोष्टी करणाऱ्या संजय राऊतांनी या संदर्भात काय स्वाभिमान दाखवला. केवळ बोलून स्वाभिमान दिसत नाही तो कृतीतून स्वाभिमान दाखवावा लागतो असेही दरेकर म्हणाले.नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय झालेला आहे, असं शिवसेनेचं म्हणणं आहे आणि दुसरीकडे नवी मुंबईत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यावरून आंदोलनं सुरू आहेत. याबाबत मत व्यक्त करताना दरेकर म्हणाले,विमानतळ नामकरणावरून स्थानिक भूमिपुत्र आंदोलन करीत आहेत. बाळासाहेबांविषयी कोणाचं दुमत नाही. पण दि.बा. पाटील यांचं सिडकोसाठी, त्या परिसरासाठी, तेथील भूमिपुत्रांसाठी अनन्यसाधारण योगदान आहे. म्हणून जर तेथील स्थानिक दिबांच्या नावाचा आग्रह धरत असतील तर सरकारने सकारात्मक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. कोळी आणि आग्री समाजाचं शिवसेना उभारणीत एक वेगळं स्थान आहे. शिवसेनेच्या उभारणीत त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं आहे. त्यामुळे या समाजाला नाराज करण्याचं, दुखावण्याचं काम शिवसेनेने करू नये.
वारीसंदर्भात सरकारने घेतलेला निर्णय धार्मिक नेत्यांना आणि वारकऱ्यांना पटलेला नाही. वारकऱ्यांना फूस लावण्याचं काम विरोधी पक्ष करीत आहे, या आरोपाचा समाचार घेताना दरेकर म्हणाले, फूस लावायला वारकरी एवढे अज्ञानी नाहीत,वारकरी संस्कार, मार्गदर्शन, प्रबोधन करण्याचं काम करत असतात. वारकऱ्यांना कमी लेखण्याच धाडस सरकारने करू नये. वारकरी सज्जन पण सक्षम आहे. पायी वारीला सरकारने परवानगी दिली नाही. त्यामुळे निर्माण झालेला असंतोष कसा डायव्हर्ट करायचा, हे या आरोपातून दिसून येत आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे, धर्म, परंपरा सोडली आहे तसेच महाराष्ट्राची वारकऱ्याची परंपराही सोडली आहे. भाजपने कोरोना नियमांचे उल्लंघन करून वारी करा, असं कधीही म्हटलं नाही. कोरोनाचे नियम पाळून, निर्बंध पाळून ५० – ५० लोकांना वारी करणं शक्य आहे, त्याला परवानगी द्या, हीच आमची मागणी आहे.

राज्यात पावसाला चांगली सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. परंतु, खतांसाठी आणि बियाणांसाठी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत बोलताना दरेकर म्हणाले, राज्याचे कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी नाशिक येथे खरीप आढावा घेताना बांधावर जाऊन खाते आणि बियाणे शेतकऱ्यांना दिली जातील, अशी घोषणा केली होती.पण ती पोकळ ठरली आहे.कोरोना संकट काळातही खत आणि बियाणांसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहे. आजही खत, बियाणे मिळत नाहीत. बीटी कपाशी बियाणे व महामंडळाच्या सोयाबीन बियाण्यामुळे खरिपाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. याकडे कृषी मंत्र्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सरकारचे नियोजन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. बोगस बियाणे आणि बोगस औषध विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे, यावर सरकारचा अंकुश नाही. बांधावर जाण्याच्या गोष्टी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री यांच्याकडूनही केल्या गेल्या होत्या, तशाच घोषणा कृषि मंत्री करीत आहेत, पण अंमलबजावणी शून्य आहे, अशी टीका दरेकर यांनी केली आहे.

Previous articleजेंव्हा मंत्री छगन भुजबळ चिमुरडीच्या आवाजाने मंत्रमुग्ध होतात..!
Next articleआता शिकाऊ वाहनचालक परवाना घेण्यासाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही