मुंबई नगरी टीम
मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रियाताई सुळे या आपल्या विनयशील स्वभावासाठी परिचित आहेत.वडील शरद पवार यांच्याकडून विनम्रतेचा वारसा मिळालेल्या सुप्रिया सुळे या पक्षातील नेते,पदाधिकारी ते सामान्य कार्यकर्त्यांशी देखील त्याच आपुलकीने बोलतात.आज सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस आहे. सकाळपासूनच देशभरातील अनेक नेते, पक्षातील पदाधिकारी कॉल,मेसेजसच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांना शुभेच्छा देत होते. यावेळी एका कार्यकर्त्याचा फोन त्यांना घेता आला नाही. मात्र त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी स्वतः या कार्यकर्त्याला कॉलबॅक करुन आस्थेवाईकपणे त्याची चौकशी केली आणि शुभेच्छांचा स्वीकार केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस अजय हिंगे पाटील हे सुप्रिया सुळेंना शुभेच्छा देण्यासाठी फोन करत होते. मात्र फोन व्यस्त असल्याकारणाने त्यांचे बोलणे होऊ शकले नाही. सुप्रिया सुळे जेव्हा घरी पोहोचल्या तेव्हा त्यांनी आठवणीने या कार्यकर्त्याला फोन लावला आणि त्याच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच त्याच्या शुभेच्छांचा विनम्रपुर्वक स्वीकार केला. आपल्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते बॅनरपासून ते बुकेपर्यंत अनेक गोष्टींची जुळवाजुळव करत असताना आपल्याला दिसतात. एवढे करुनही राजकारणी मंडळी प्रत्येक कार्यकर्त्याची दखल घेतातच,असे नाही.मात्र सुप्रिया सुळे या पारंपरिक राजकारणाला बाजूला सारून स्वतःची वेगळी अशी कार्यशैली विकसित करत आहेत. स्वतःहून कार्यकर्त्याला कॉल करत त्याच्या शुभेच्छा स्वीकारणाऱ्या राजकारणातील या नेत्या खरंच विरळ आहेत.