विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी हालचाली सुरू; बहुमतापेक्षा जास्त मते घेवू : मविआचा दावा

मुंबई नगरी टीम

मुंबई । येत्या सोमवापासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून,राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत पत्र पाठवल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.तर अध्यक्षपदासाठी आम्ही निवडणूक घेवू पण राज्यपालांनी अगोदर विधानपरिषदेत रिक्त असणा-या १२ जागा भरण्याचा निर्णय घ्यावा असा टोला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने लगावला आहे.

काँग्रेस पक्षश्रेष्टींनी नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्यापासून विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनातही अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली नव्हती.त्यामुळे विरोधी पक्षनेते पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आक्रमक झाले आहेत.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेवून विधानसभा अध्यक्षपद तातडीने भरण्याची सूचना केली होती. त्यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनाचा आधार घेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवून विधानसभा अध्यक्षांचे संविधानिक पद तातडीने भरण्याची सूचना केली आहे.विरोधी पक्षनेत्यांनी राज्यपालांकडे अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली आहे.त्याचाही उल्लेख राज्यपालांनी या पत्रात केला आहे.विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसच्या कोट्यात असल्याने याची निवडणूक या अधिवेशनात व्हावी असा आग्रह काँग्रेसचा आहे.दोनच दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेवून यावर चर्चा केली आहे.

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या या पत्राचे पडसाद महाविकास आघाडीमध्ये उमटले असून,भाजपाच्या मागणीवरून राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षाच्या निवडीबाबत आदेश देऊ नयेत असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. तसेच याबाबत पावसाळी अधिवेशनात निर्णय होईल,असे पटोले यांनी स्पष्ट केले.तर अध्यक्षपदाच्या निवडणूकीत बहुमतापेक्षा जास्त मते घेवू असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.राज्यपाल विधानसभा उपाध्यक्षांना अध्यक्ष पदाची निवडणूक लवकर करा असे सूचित करत आहेत. मात्र विधानपरिषदेच्या १२ जागा रिक्त आहेत तो पण विषय प्रलंबित आहे.तो निकाली काढलात तर १२ आमदार महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी कामाला लागतील,असा टोला मलिक यांनी लगावला

Previous articleजेव्हा…खा.सुप्रिया सुळे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी कार्यकर्त्यांना कॉलबॅक करतात !
Next articleमला मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही,उद्धव ठाकरेच पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील !