चिपळूणच्या पुरात लाखोंची रक्कम घेवून एसटीच्या टपावर ९ तास बसलेल्या आगार प्रमुखांचे कौतुक

मुंबई नगरी टीम

चिपळूण । चिपळूण शहराला पुराचा वेढा पडला असतानाही स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रसंगी आपल्या सहकाऱ्यांचे तसेच सरकारी मालमत्तेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी धाडसी कार्य करणारे चिपळून आगार प्रमुख रणजित राजेशिर्के यांचा आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी चिपळून येथे विशेष सत्कार केला. राजेशिर्के यांच्यासारखे आत्मियतेने आणि तळमळीने सरकारी मालमत्तेचे संरक्षण करणारे कर्मचारी महामंडळामध्ये आहेत, म्हणूनच एसटीचे वैभव आज टिकून आहे.या वैभवामुळेच एसटीची नाळ आजही जनसामान्यांमध्ये रूजलेली आहे, असे कौतुकौद्गार काढत राजेशिर्के यांच्यासारख्या कर्मचाऱ्यांच्या विश्वासावर एसटीला आर्थिक गर्तेतून नक्कीच बाहेर काढू, असा विश्वासही ॲड.परब यांनी यावेळी व्यक्त केला.

आधीच एसटीचे चाक आर्थिक गर्तेत अडकलेले असतानाच गेल्या आठवड्यात कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण येथील एसटी स्थानक पुराच्या वेढ्यात पुरते बुडाले. पुरामुळे एसटीचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले. अशा प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून चिपळूण आगार प्रमुख रणजित राजेशिर्के यांनी पुराच्या पाण्यातून एसटी स्थानकात धाव घेतली. त्यांनी प्रसंगावधान दाखवून आगारातील शक्य तितके सामान सुरक्षित स्थळी हलविण्याचा प्रयत्न केला. तसेच चालकांच्या मदतीने काही गाड्याही बाहेर काढल्या. परंतु पाण्याची पातळी बघता भरपावसात लाखो रूपयांची रोख रक्कम घेऊन राजेशिर्के हे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत एसटीच्या टपावर बसले. सुमारे ९ तास ते टपावर बसून होते. त्यामुळे राजेशिर्के यांनी स्वत:सह आपल्या इतर कर्मचाऱ्यांचाही जीव वाचवला. त्यांच्या या धाडसी कार्याची एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दखल घेत बुधवारी चिपळूण आगारात राजेशिर्के यांचा विशेष सत्कार केला. यावेळी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी उपस्थित होते.

Previous articleMPSC च्या उमेदवारांसाठी सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
Next articleदेवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकरांचे पूरग्रस्तांसोबत जेवण; जाणून घेतल्या व्यथा