राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे,चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली इच्छा !

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबई महानगरपालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी भेट घेवून विविध विषयांवर सुमारे ५० मिनिटे चर्चा केल्याने भाजप-मनसे युतीच्या चर्चांना उधाण आले आहे.तर राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे,ही जनतेच्या मनात असेलेली इच्छा मी त्यांच्यासमोर व्यक्त केली,अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकरांशी बोलताना दिली.

मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील इतर महानगरपालिकांच्या निवडणूका येत्या फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता असून,या पार्श्वभूमीवर शिवसेनेपासून दुरावलेल्या भाजपने मनसेला जवळ करण्यासाठी सुरूवात केली आहे.त्याचाच एक भाग म्हणून आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी भेट घेतली.या भेटी दरम्यान राज ठाकरे आणि पाटील यांच्यात सुमारे ५० मिनिटे विविध विषयांवर चर्चा झाली.या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी “विद्यार्थी चळवळीच्या दिवसांपासून राज ठाकरे यांच्याशी माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. कोणत्याही प्रकारच्या स्वार्थासाठी आपल्या राजकीय विचारांना किंवा भूमिकांना मुरड घालण्याचा त्यांचा स्वभाव नाही.त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे,ही जनतेच्या मनातली इच्छा मी त्यांच्यासमोर व्यक्त केली असे सांगितले.आजच्या भेटीत आमची राजकीय चर्चा झाली. पण मनसे-भाजपच्या युतीचा या भेटीत प्रस्ताव देण्यात आलेला नाही.तसेच युतीवर चर्चाही झाली नाही,असे पाटील यांनी स्पष्ट केले.

नाशिकच्या दौ-यावर असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली.त्यावेळी त्यांनी मला भेटीचे निमंत्रण दिले होते.त्यानुसार मी आज त्यांची भेट घेतील.या भेटीत राजकीय चर्चा झाली.मात्र भाजप आणि मनसे युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.या बैठकीत एकमेकांना समजून घेणे,एकमेकांचे विचार सांगणे हा विषय होता,असेही त्यांनी सांगितले. मनसेची परप्रांतीयांविषयी असलेली भूमिका बदलल्याशिवाय युतीची चर्चा होणार नाही,असे मी यापूर्वीच सांगितले आहे.त्यावर राज ठाकरे यांनी मला त्यांच्या भाषणाच्या काही क्लिप पाठवल्या होत्या. त्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. आजची भेटही सदिच्छा भेटी होती. जर उत्तरप्रदेशात त्यांच्या लोकांना रोजगारात ८० टक्के आरक्षण पाहिजे असेल तर महाराष्ट्रातील तरूणांना येथेच रोजगार मिळायला हवा असे त्यांनी सांगितले यात गैर काही नाही असा सवालही पाटील यांनी यावेळी केला.भाजप जर रयत संघटना आणि इतर पक्षांना मान देऊ शकतो, तर राज ठाकरे हे मोठे नेतृत्व आहे.युतीबाबत भाजपच्या कोअर कमिटीमध्ये निर्णय होईल असेही पाटील यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.

Previous articleमाजी राज्यमंत्र्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; काँग्रेसला घवघवीत यश मिळण्यासाठी कामाला लागा
Next articleरेल्वे आमच्या हक्काची…नाही कुणाच्या बापाची ! मुस्कटदाबी सहन करणार नाही