मुंबई नगरी टीम
मुंबई । मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना येत्या १५ ऑगस्ट पासून उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यास मुभा देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.त्यानुसार नागरिकांना लोकल रेल्वे प्रवास करणे सोयीचे व्हावे,त्यांना मासिक रेल्वे प्रवास पास मिळावा, यासाठी कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया उद्या बुधवार ११ ऑगस्ट पासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ५३ रेल्वे स्थानकांवर तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात १०९ स्थानकांवर सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत सलग दोन सत्रांमध्ये सुरु होणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.
सर्वसामान्यांना उपनगरीय रेल्वे प्रवास करता यावा यासाठी उद्या बुधवार ११ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेपासून उपनगरीय रेल्वे स्थानकांवर कोविड लसीकरण ऑफलाईन पडताळणी व मासिक रेल्वे पास देण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.नागरिकांनी पडताळणीसाठी येताना कोविड लसीकरण दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र व छायाचित्र ओळखपत्र पुरावा आणणे आवश्यक असून,पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकलने प्रवास करता येणार आहे.नागरिकांना लोकल रेल्वे प्रवास करणे सोयीचे व्हावे आणि त्यांना मासिक रेल्वे प्रवास पास मिळावा,यासाठी कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया उद्या बुधवार,११ ऑगस्ट पासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ५३ रेल्वे स्थानकांवर तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात १०९ स्थानकांवर सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत सलग दोन सत्रांमध्ये सुरु होणार आहे. त्याआधारे नागरिकांना मासिक रेल्वे प्रवास पास रेल्वेकडून देण्यात येईल,अशी माहिती चहल यांनी दिली आहे.ज्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत,त्यांना मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.त्यासाठी ऑनलाईन ऍपद्वारे तसेच ऑफलाईन अशा दोन्ही रितीने सुविधा पुरवली जाणार आहे.ऍप तयार करुन ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्याची कार्यवाही काही कालावधीत सुरु होईल.तत्पूर्वी उद्या, ११ ऑगस्ट पासून ऑफलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. जेणेकरुन सर्वसामान्य मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होवू नये, असे चहल यांनी नमूद केले.रेल्वे मासिक प्रवास पास देण्याची ही ऑफलाईन प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत आणि आठवड्यातील सर्व दिवशी सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी करु नये, असे आवाहन चहल यांनी केले आहे.बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण ५३ उपनगरीय रेल्वे स्थानकांवर ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरीलस्थानकांचा देखील समावेश आहे.या सर्व स्थानकांवर मिळून तिकिट खिडकी जवळ एकूण ३५८ मदत कक्ष असतील.मुंबई महानगरासह आजुबाजूची सर्व शहरे मिळून म्हणजे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर रिजन) एकूण १०९ लोकल रेल्वे स्थानकांवर ही ऑफलाईन पडताळणी सुविधा उपलब्ध असेल.
ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले आहेत,अशा नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याच्या वैध प्रमाणपत्राची प्रत (हार्ड कॉपी), त्यासोबत छायाचित्र ओळखपत्र पुरावा असे दोन्ही दस्तावेज सोबत घेवून घरानजीकच्या रेल्वे स्थानकावर जावे. हे दोन्ही किंवा यातील एक कागदपत्रं जरी नसेल, तरी रेल्वे स्थानकावर, रेल्वे प्रशासनाकडून प्रवेश नाकारण्यात येईल, रेल्वे स्थानकावरील तिकिट खिडकीजवळ आल्यानंतर,महानगरपालिका (अथवा संबंधित महानगरपालिका,नगरपरिषद,स्थानिक स्वराज्य संस्था) यांच्याद्वारे स्थापन केलेले मदत कक्ष असतील. हे मदत कक्ष सकाळी ७ ते दुपारी ३ आणि दुपारी ३ ते रात्री ११ अशा सलग दोन सत्रांमध्ये सुरु राहणार आहेत. मदत कक्षावरील महानगरपालिकेचे कर्मचारी हे संबंधित नागरिकाच्या कोविड लसीकरण अंतिम प्रमाणपत्राची वैधता कोविन ऍपवर तपासतील. तसेच छायाचित्र ओळखपत्र पुरावादेखील तपासतील.पडताळणीमध्ये दोन्ही कागदपत्रं वैध असल्याचे निश्चित झाल्यानंतर,कोविड प्रमाणपत्रासह छायाचित्र ओळख पुराव्याच्या प्रतीवर देखील विहित नमुन्यातील शिक्का मारण्यात येईल. सदर शिक्का मारलेले कोविड अंतिम प्रमाणपत्र रेल्वे स्थानकावरील तिकिट खिडकीवर सादर करावे लागणार असून,त्यानुसार रेल्वे प्रशासनाकडून मासिक रेल्वे प्रवास पास देण्यात येईल.
कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेल्या किंवा फक्त एकच डोस घेतला असल्याच,अशा नागरिकांना सद्यस्थितीत उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा नसेल.मुंबई महानगर तसेच मुंबई प्रदेशातील लोकसंख्या लक्षात घेवून उपनगरीय रेल्वे स्थानकांवर जेवढ्या तिकिट खिडक्या असतील, तेवढ्याच संख्येने मदत कक्ष देखील असतील. तसेच सकाळी ७ ते रात्री ११ अशी तब्बल १६ तास पडताळणी सुविधा सुरु राहणार आहे.कोणी बनावट कोरोना लसीकरण प्रमाणपत्र आणण्याचा प्रयत्न केला, तर अशा व्यक्तिंविरुद्ध साथरोग नियंत्रण यानुसार कठोर पोलीस कार्यवाही करण्यात येईल,असेही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.अत्यावश्यक सेवेतील शासकीय,निमशासकीय आणि इतर कर्मचारी यांना सध्याच्या पद्धतीनुसारच, म्हणजेच कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असोत वा नसोत, त्यांना रेल्वे प्रवासाची मुभा सुरु राहील.त्यामुळे त्यांनी नियमित पद्धतीने उपनगरीय रेल्वे प्रवास करावा, असे कळविण्यात येत आहे.मुंबई महानगर प्रदेशातील इतर सर्व महानगरपालिका,नगरपरिषद,स्थानिक स्वराज्य संस्था यांनाही याचप्रकारे उद्यापासून व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे त्या-त्या भागातील रहिवाशांनी नजीकच्या रेल्वे स्थानकावर जावून वैध प्रक्रिया पार पाडावी असेही आवाहन करण्यात आले आहे.शासनाकडून ऑनलाईन प्रक्रिया उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु आहे. पुढील आदेश येईपर्यंत ऑफलाईन प्रक्रिया सुरु राहणार आहे.