‘त्या’ पहाटेच्या शपथविधीला सहमती होती का ? शरद पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट

मुंबई नगरी टीम

मुंबई । २०१९ साली राज्यात राष्ट्रवादी,शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षाचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महाराष्ट्र झोपेत असतानाच अचानक राजभवनावर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी उरकला आणि या शपथविधीमुळे राज्यात राजकीय भूकंप झाला.या खेळीमागे शरद पवार यांचीच चाल असल्याचे त्यावेळी बोलले जात होते.मात्र यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत खुलासा करीत संभ्रम दूर केला आहे.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेतला.दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याची बोलणी सुरू होती.राज्यात शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार स्थापन होणार हे जवळजवळ निश्चित होते.राज्यातील या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र साखर झोपेत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी उरकला आणि राज्यात राजकीय भूकंप झाला.त्यानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः या प्रकरणात पुढाकार घेत अजित पवार यांच्या सोबत नसणा-या आमदारांना सोबत घेऊन हा राजकीय भूकंप अल्पजीवी ठरवला.मात्र शरद पवार यांनीच अजित पवारांना फडणवीसांकडे पाठवल्याचे बोलले जाते.यावर खुद्द शरद पवार यांनीच खुलासा केला आहे.शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त लोकसत्तातर्फे अष्टावधानी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी घेतलेल्या मुलाखतीत पवार बोलत होते.

त्या पहाटेच्या शपथनिधी सोहळ्याला मीच अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस आणि भाजपासोबत पाठवले अशी चर्चा आहे,मी त्यांना पाठवले असते, तर त्यांनी राज्यच बनवले असते. त्यांनी अर्धवट काही काम केले नसते. त्यामुळे मी अजित पवार यांना पाठवले होते यात काहीच अर्थ नाही. असे पवार यावेळी म्हणाले.निवडणूक निकालानंतर स्पष्ट बहुमत कोणत्याच पक्षाला नव्हते.युती म्हणून सेना-भाजपाकडे बहुमत होते.मात्र मुख्यमंत्रीपदावरून त्या दोघांत वाद सुरू होता.त्याचा फायदा घेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मी दिल्लीत एक वक्तव्य केले की,देवेंद्र फडणवीस यांना बहुमतासाठी काही लोकांची कमतरता असेन तर आम्ही त्याचा गांभीर्याने विचार करू. माझे ते एक वक्तव्य सेना-भाजपातील अंतर वाढायला फार उपयोगी पडले असेही पवार यांनी मिश्किलपणे सांगितले.सेना भाजप हे एकत्र कसे येतील याचा आम्ही विचार केला असता तर आम्ही ५ वर्षे सत्तेबाहेर राहिलो असतो.माझ्या त्या एका वक्तव्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आणि भाजप राष्ट्रवादीसोबत जावू शकते ही शक्यता निर्माण झाली. त्यामुळे शिवसेना आमच्यासोबत आली असेही पवार यांनी सांगितले.पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्यात राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र यावे यावर चर्चा झाली होती. मात्र हे शक्य होणार नाही, आम्हाला तुम्हाला अंधारात ठेवायचे नाही, आपली भूमिका वेगळी आहे असे यावेळी मोदी यांनी सांगितले.असा खुलासाही पवार यांनी केला.

Previous article‘थर्टी फर्स्ट’ कसा साजरा करायचा ? गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी
Next articleमोदींनी ऑफर दिली होती हे सांगायला शरद पवारांना इतका वेळ का लागला ?