ठाकरे सरकारकडून नारायण राणे यांना सूडबुद्धीने अमानुष वागणूक

मुंबई नगरी टीम

पुणे । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची न्यायालयाने जामीनावर मुक्तता केल्यामुळे सत्याचा विजय झाला आहे.ठाकरे सरकारने सूडबुद्धीने अमानुष वागणूक दिल्यामुळे नारायण राणे यांची तब्येत बिघडली. पण ते बरे झाल्यानंतर त्यांची कोकणातील जन आशिर्वाद यात्रा लवकरच पुन्हा सुरू होईल,असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पुण्यात सांगितले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी महाविकास आघाडी सरकारकडून अत्यंत अमानुष व्यवहार झाला. त्यांना पोलिसांनी अटक केली त्यावेळी ते जेवत असताना हातातले ताट काढून घेतले गेले. त्यांना अडीच तास संगमेश्वर पोलीस स्थानकात बसवून ठेवले.रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे आणि रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना उपचार देण्याची गरज आहे, असे डॉक्टरांनी अटक करताना सांगूनही वैद्यकीय उपचार दिले नाहीत. यामुळे राणे यांची तब्येत बिघडली. तथापि, विश्रांती घेतल्यानंतर राणे यांची तब्येत सुधारली की लवकरच त्यांची जन आशिर्वाद यात्रा पुन्हा सुरू होईल असे पाटील यांनी स्पष्ट केले.राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेला मुंबई आणि रायगड जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे घाबरलेल्या ठाकरे सरकारने त्यांना अटक केली. आता सरकारने घाबरून सिंधुदूर्ग जिल्ह्यात काल रात्री बारापासून सात दिवसांसाठी संचारबंदी लागू केली आहे. पण त्याने भाजपाला फरक पडत नाही. राणे यांची तब्येत बरी झाली की पुन्हा यात्रा सुरू होईल असे पाटील यांनी सांगितले.

राज्यात काल दिवसभरात झालेला राजकीय खेळ हा पूर्णपणे सूडबुद्धीने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी सरकारने न्यायालयात मांडलेला कोणताही मुद्दा टिकला नाही आणि न्यायालयाने राणे यांची जामीनावर मुक्तता केली.सत्याचा विजय झाला. गेली वीस महिने आघाडी सरकारने एखादा कार्यकर्ता किंवा संस्था यांना अडकविण्यासाठी केलेला एकही प्रयत्न न्यायालयात टिकला नाही आणि सरकारला न्यायालयाकडून थपडा खाव्या लागल्या. तसेच आताही झाले आहे असा टोला पाटील यांनी लगावत,राणे यांना अटक करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी कशी दादागिरी केली आणि बळाचा वापर करण्यास सांगितले हे काल दूरचित्रवाणी वाहिनीने दाखविले आहे. भाजपा अनिल परब यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही पाटील यावेळी म्हणाले.

Previous article“लक्षात ठेवा, तुम्हाला घरेदारे मुले आहेत”, नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना ठणकावले
Next articleराज्य सरकारचा निर्णय : शालेय अभ्यासक्रमात कृषि विषयाचा समावेश करणार