“लक्षात ठेवा, तुम्हाला घरेदारे मुले आहेत”, नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना ठणकावले

मुंबई नगरी टीम

मुंबई । मी नसताना माझ्या घरासमोर येऊन आंदोलन करता पण,तुम्हालाही मुलेबाळे आहेत,घरेदारे आहेत,इतकी आठवणे ठेवा,असा गर्भित इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या नावाचा उल्लेख न करता दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द काढल्याबद्दल बुधवारी रत्नागिरी पोलीसांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना अटक केली होती. आज उच्च न्यायालयाने राणे यांना १७ सप्टेंबर पर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.त्यानंतर बुधवारी दुपारी राणे यांनी त्यांच्या निवासस्थानी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. मात्र नेहमी आक्रमक शैलीत बोलणारे राणे यांचा सूर नरमाईचा होता.’मी जे काही बोललो ते देशाचा अवमान सहन न झाल्याने बोललो. राष्ट्राबद्दल अवमान दाखवला म्हणून बोललो. त्यात राग येण्यासारखे काही नव्हते.पण, खटला न्यायालयात आहे,त्यामुळे ते वाक्य मी परत उच्चरणार नाही,असे स्पष्ट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख त्यांनी महाशय असा केला. तर शिवसेनेचा उल्लेख त्यांनी विरोधी मित्र म्हणून केला.शिवसेनेने अपशब्द कधी काढले नाहीत का ? असा सवाल राणे यांनी उपस्थित करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या यापूर्वीच्या भाषणातील आक्षेपार्ह शब्दांची उजळणीही केली.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांना उद्धव ठाकरे ढोंगी म्हणाले होते. शिवसेना भवनाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना थापडा मारण्याची मुख्यमंत्र्यांनी भाषा केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांना ते निर्लज्ज म्हणाले होते, असे दाखले राणे यांनी यावेळी दिले.

शिवसेना वाढवण्यात माझा वाटा आहे. तुम्हा सर्वांना मी पुरुन उरलो आहे. तुम्ही माझे काही करु शकत नाही, असे राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे बजावले. तसेच माझ्या अटेकवेळी पोलीसांवर दबाव टाकणारे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात आपण न्यायालयात जाणार आहोत, असे राणे यांनी जाहीर केले.जनआशिर्वाद यात्रा दोन दिवसांनी पुन्हा चालु होईल. यापुढे आपण जरा जपून पावले टाकू तसेच चांगल्या शब्दात राज्य सरकारवर टिका करतच राहू असे राणे यांनी निक्षून सांगतिले.राणे यांनी कालच्या घटनेत भाजप आपल्या पाठिशी राहिल्याबद्दल पक्षप्रमुख नड्डा,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या नेत्यांचे आभार मानले.गेली ५२ वर्षे मी राजकारणात आहे,मात्र अशी बातमीदारी कधी पाहिली नाही.काहींना वाचवण्याची माध्यमांनी सुपारी घेतली आहे अशा शब्दात त्यांनी माध्यमांवर नाराजी व्यक्त केली.यापुढे मी आता गप्प बसणार नाही. काही मंत्र्यांना अटक होईपर्यंत पाठपुरावा करणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Previous articleराज्यात बैलगाडी शर्यती महिनाभरात सुरू करण्याचे संकेत ।
Next articleठाकरे सरकारकडून नारायण राणे यांना सूडबुद्धीने अमानुष वागणूक