घरात,पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला

मुंबई नगरी टीम

रत्नागिरी । केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राणे यांना झालेल्या अटकेनंतर राज्यात शिवसेना विरूद्ध भाजप असा सामना रंगला होता.आज राणे यांची जनआशिर्वाद यात्रा पुन्हा सुरू झाली.आज कोकणात राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे.घरात,पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री पहिल्यांना पाहिला.हे वर्षावर जाऊन गप्पा मारत बसतात,असा टोला राणे यांनी लगावला आहे.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रे दरम्यान महाडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.त्यानंतर मुंबईसह राज्यातील अनेक शहरांत शिवसेना विरूद्ध भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते.राणे यांना जामीन मिळाल्यानंतर दोन दिवसानंतर राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेला पुन्हा सुरूवात झाली आहे.रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष केले.घरात राहून,पिंजऱ्यात राहून कोणी सत्ता चालवली नाही,अशी टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता केली.राणे यांच्या पाठी लागू नका.नाही तर मी आता थोडंच बोलतोय.नाही तर सर्वच बोलावं लागेल.ते परवडणार नाही असा इसारा राणे यांनी शिवसेनेला दिला.सर्वच बोललो तर ते परवडणार नाही,मी गुन्हेगारी वृत्तीचा होतो तर मुख्यमंत्री,मंत्री, आमदार,नगरसेवक शाखाप्रमुख कसे केले ? असा सवालही त्यांनी करीत तेव्हा तुम्ही विरोध का केला नाही असा प्रश्नही उपस्थित केला.

यावेळी राणे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडणा-या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.हे दोघेही माझ्या दृष्टीने वायफळ बडबड करणारे नेते आहेत.संजय राऊतांना त्याचसाठी ठेवलं आहे.संपादक सोडा त्यांना हे बोलायलाच ठेवलेले आहे.संजय राऊत आणि विनायक राऊत हे शिवसेनेला बुडवतील,असा टोलाही राणे यांनी लगावला.अभिनेता सुशांतसिह राजपूत आणि दिशा सालियानची हत्या झाली.मात्र त्याचे आरोपी अद्याप मिळाले नाही असे सांगून,राणेच्या पाठीमागे लागू नका, नाहीतर मी आता थोडं बोलत आहे, नाहीतर सगळं बोलावं लागेल ते परवडणारे नाही, अशा इशारा त्यांनी दिला. मी कुठलाही गुन्हा केला नाही.मात्र सत्ता असल्याने काही लोक सत्तेची मस्ती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.आम्ही काही कायम विरोधी पक्षात राहण्यासाठी आलो नाही.भविष्यात आम्हीही सत्तेत येईल, त्यामुळे अधिकारी, पोलिसांनी कायद्यात राहून काम करावे असा सूचक इशाराही राणे यांनी दिला.सभेची बंधने केवळ नारायण राणेंनाच का ? असा सवालही राणे यांनी यावेळी केला.शिवसेनेतील अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचा गोप्यस्फोट राणे यांनी करून भाजपची ओरिजिनल आयडॉलॉजी स्वीकारूनच आम्ही पक्षात प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous articleआशा स्वयंसेविकांना १ हजार तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात १२०० वाढ
Next articleओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेवू नका