मी विधानपरिषदेचा आमदार,त्यात मुख्यमंत्री त्यामुळे माझा मतदार संघ संपूर्ण राज्य !

मुंबई नगरी टीम

मुंबई । कालच राज्यातील शाळा सुरु झाल्या आणि आज आपला इथे वर्ग भरला,आजही आपण विद्यार्थीच आहोत.सभापती आणि उपसभापती यांनी थोडं गुरूजींसारखं वागावं लागेल.मी विधानपरिषदेचा आमदार,त्यात मुख्यमंत्री असल्याने संपूर्ण राज्य हाच माझा मतदारसंघ म्हणून मला संपूर्ण राज्याचा विचार करावा लागतो.अर्थसंकल्प ही ठिपक्यांची रांगोळी असून प्रत्येक ठिपका हा राज्याचा मतदारसंघ आहे,हे मतदारसंघ जोडले तर जी सुंदर रांगोळी तयार होणार आहे त्यात आपल्याला विकासाचे रंग भरावयाचे आहेत. त्यातूनच विकसित राज्याची सुंदर रांगोळी आपल्याला रेखाटता येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी मध्यवर्ती सभागृह, विधान भवन,येथे राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्य शाळेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,कालच राज्यातील शाळेची घंटा वाजली आणि आज आपला वर्ग भरला. सभापती आणि उपसभापती यांनी थोडं गुरुजीसारखं वागावं लागेल.मी विधानपरिषदेचा आमदार, त्यात मुख्यमंत्री आणि माझा मतदारसंघ हे संपूर्ण राज्य आहे.अर्थसंकल्प ही ठिपक्यांची रांगोळी असून प्रत्येक ठिपका हा राज्याचा मतदारसंघ आहे,हे मतदारसंघ जोडले तर जी सुंदर रांगोळी तयार होणार आहे त्यात आपल्याला विकासाचे रंग भरावयाचे आहेत. त्यातूनच विकसित राज्याची सुंदर रांगोळी आपल्याला रेखाटता येईल. अर्थसंकल्पातील योजना आणि विकासकामांचा अधिकाधिक लाभ आपापल्या मतदारसंघातील नागरिकांना मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सजग राहून पाठपुरावा केला पाहिजे, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केले.

या कार्यशाळेला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाई, वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई, संसदीय कार्य राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहाचे सदस्य, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे मानद सल्लागार हेमंत टकले, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अर्थसंकल्पातील बाबी ठरल्याप्रमाणे अंमलात आणण्याची तसेच अर्थसंकल्प समजून घेऊन त्यावर नेमकं बोलण्याची गरज असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्वसामान्य नागरिक हे विधानमंडळाच्या अधिवेशनावर लक्ष ठेवून असतात याची जाणीव उपस्थितांना करून दिली.ठाकरे म्हणाले की, आपण ज्या लोकप्रतिनिधींना मतदान करतो ते मतदार विधानमंडळाच्या कामकाजावर लक्ष ठेवून असतात. मतदारसंघाचे किती प्रश्न सभागृहात मांडतात याकडे मतदारांचे लक्ष असते. त्यामुळे थोर परंपरा लाभलेल्या या सभागृहात बोलण्याची संधी मिळाली असताना सभागृहाचे कामकाज समजून घेवून आपल्याला मिळालेली ही उच्च परंपरा कशी जपता येईल याची प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे.

Previous articleनवरात्रौत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी; गरबा,दांडिया खेळण्यास बंदी
Next articleअरबाज मर्चंटला अटक करणारा मनिष भानुशाली भाजपचा उपाध्यक्ष : नवाब मलिकांचा सनसनाटी आरोप