भाजपला सत्तेची मस्ती ; राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा घणाघात

मुंबई नगरी टीम

मुंबई । भाजपला सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर शरसंधान साधले.लखीमपूर हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन केले होते.त्यानुसार हुतात्मा चौकात राष्ट्रवादीच्यावतीने मोदी व योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांनी पहिल्यांदा तो व्हिडीओ बघावा त्यात माणुसकी दिसते आहे का ? त्यात क्रुरता दिसतेय असे सांगतानाच पहिले आपण माणसं आहोत ना असा सवालही सुळे यांनी केला.सरकार कुणाचंही असो ही जी कृती झाली ती चिंताजनक आहे. त्यामुळे केंद्रसरकारने जनतेला व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा सुळे यांनी व्यक्त केली.

भाजपकडून या बंदला विरोध म्हणजे शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं अप्रत्यक्ष समर्थन आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. लखीमपूरमधील हत्याकांडाची तुलना केवळ जालियनवाला बाग हत्याकांडाशीच होऊ शकते. त्याचा महाराष्ट्रातील घराघरातून निषेध होईल असेही पाटील म्हणाले.महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि आमचे मित्रपक्ष यांच्यावतीने हा बंद आम्ही पुकारला आहे. भाजप आजपर्यंत देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत होती. दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. पण लखीमपूरसारखी घटना जाणीवपूर्वक केलेलं हत्याकांड आहे असा थेट आरोपही पाटील यांनी यावेळी केला. भाजपाच्या मंत्र्यांच्या चिरंजीवाने हे हत्याकांड केलंय. अद्यापही त्याला अटक होत नाही, त्याला सन्मानाने बोलावलं जातं. भाजपाला शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचं काम करायचं आहे. त्याचा निषेध म्हणून मविआच्या सर्वच पक्षांनी हा बंद पुकारला आहे.सरकारचा या बंदशी सूतराम संबंध नाही. भाजपने केलेल्या या कृत्याचा निषेध म्हणून जनताच उत्स्फूर्तपणे सहभागी झाली आहे असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Previous articleउत्तरप्रदेशात रामराज्याच्या नावाखाली तालीबानी राजवट : नाना पटोलेंचे टीकास्त्र
Next articleआयकर खात्याच्या छाप्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडीचा बंद