मुंबई नगरी टीम
पुणे । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे वचन दिले होते.शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करायचे होते,तर दिवाकर रावते,सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदे होते.पण, मुख्यमंत्री तर तुम्हालाच व्हायचे होते, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.फडणवीस यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत घेतला आहे.
आज तुम्ही मुख्यमंत्री असता किंवा नंतर मुख्यमंत्री झाला असता.शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी बसवून कदचित मीही राजकारणातून बाजूला झालो असतो.केवळ जबाबदारीच्या भावनेने मी राजकारण आणि मुख्यमंत्रीपद सांभाळत आहे.शिवसेना प्रमुखांना मुख्यमंत्रीपदाचे दिलेले वचन मी पाळले. दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.त्यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा होती आणि त्यांनी ती पूर्ण केली.राजकारणात महत्त्वाकांक्षा असणे वाईट नाही. पण, त्याला तत्वज्ञानाचा मुलामा लावणे आतातरी बंद करा.शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करायचे होते,तर दिवाकर रावते, सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदे होते.पण, मुख्यमंत्री तर तुम्हालाच व्हायचे होते, असेही फडणवीस म्हणाले.फडणवीसांच्या टीकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे हे कोणत्या परिस्थितीत मुख्यमंत्री झाले हे सांगतानाच फडणवीस यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.आजच्या पत्रकार परिषदेत पवार यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केले.
महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व कोणी करावे,यासाठी दोन ते तीन नावे पुढे आली होती.नेता निवडीसाठी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे हे माझ्या शेजारी बसले होते.त्यावेळी महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनीच करावे यासाठी मी त्यांचा हात वर केला.मात्र उद्धव ठाकरे नेतृत्व करायला तयार नव्हते.त्यांची मुख्यमंत्री होण्याची तयारी नव्हती असे सांगतानाच महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात अनेकांचा सहभाग होता.त्यात माझा थोडा वाटा होता असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.उद्धव ठाकरे यांना मी लहानपणापासून ओळखत आहे.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे माझे मित्र होते. माझे त्यांच्याशी राजकीय मतभेद असले तरी पण व्यक्तिगत सलोखा अत्यंत जवळचा होता.बाळासाहेब हे दिलदार व्यक्तीमत्व होते.त्यांच्या महाराष्ट्रासाठी मोठे योगदान आहे.राज्यात जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याची वेळ आली तेव्हा सर्वात जास्त आमदार असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नेतृत्व स्वीकारण्यासाठी भाग पाडले असेही पवार म्हणाले.फडणवीस यांनी नको त्या गोष्टींवर आक्षेप घेवून नये, कारण त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पाच वर्षे काम केले आहे.त्यामुळे दोघांना एकमेकांचा चांगला परिचय असल्याने त्यांनी ठाकरे यांच्यावर आरोप करणे योग्य नाही असेही पवार यांनी यावेळी सांगितले.