मुंबई नगरी टीम
मुंबई । काही दिवसापूर्वी मुंबई पोलिसांचे संरक्षण मागणारे समीर वानखेडे आज अचानक मुंबई पोलिसांविषयी अविश्वास दाखवत आहे याचा अर्थ त्यांनी बनावटगिरी केली आहे म्हणून मुंबई पोलिसांना घाबरत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
आज आर्यन खानला जामीन मिळाल्यावर नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणात आर्यन खान व इतर दोघांना हायकोर्टाने जामीन दिला आहे. कालच दोघांना एनडीपीएस कोर्टाने जामीन दिला होता. एकंदरीत आज ज्यापध्दतीने एनसीबीने युक्तीवाद केला. त्याअगोदरच ही केस किल्ला कोर्टात जामीन देण्यासारखी होती परंतु एनसीबीचे वकील नवनवीन युक्तीवाद करुन लोकांना जास्त दिवस तुरुंगात कसे ठेवता येईल, असा प्रयत्न करत होते. शेवटी उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे असेही मलिक म्हणाले. ही केस बनावटगिरी आहे. या मुलांना जाणुनबुजुन समीर वानखेडे यांनी अडकवले आहे. पुरावे घेऊन हे लोक न्यायालयात गेले तर ही केस बाद ठरु शकते असा दावाही मलिक यांनी केला.
लोकांना तुरुंगात टाकणारे समीर वानखेडे आज न्यायालयात जाऊन मुंबई पोलिसांकडे केस न देता माझी सीबीआय किंवा एनआयएमार्फत चौकशी करा म्हणत आहे. मात्र मुंबई पोलिसांनी समीर वानखेडे यांना अटक करायची असेल तर ७२ तासाची नोटीस दिली जाईल असे स्पष्ट केले आहे. कालपर्यंत मला अटक करु नका मला संरक्षण द्या असे सांगणारे समीर वानखेडे न्यायालयात धाव घेतात आणि मुंबई पोलिसांविषयी अविश्वास दाखवतात याचा अर्थ यामध्ये काळंबेरं आहे असेही मलिक म्हणाले.