पुण्याचा पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच,अजितदादांच्या नेतृत्वात निवडणूक जिंकणार

मुंबई नगरी टीम

पुणे । राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली आहे.या निवडणुकांच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्षांना कंबर कसली असतानाच राष्ट्रवादीच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात मोठं वक्तव्य केले आहे.पुण्याचा पुढचा महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात निवडणूक जिंकणारच त्यासाठी तयारीला लागा, असा आदेश त्यांनी पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना दिलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज पुण्यात नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना हे आवाहन केले.त्यांनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यावर भाष्य करतानाच भाजपवर जोरदार हल्ला चढवला.पुण्यातील जनता भाजपला थकले आहेत.भाजपाला एकदा मतदान केले,मात्र गेल्या पाच वर्षात कोणतेच काम झाले नसल्याने आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचा महापौर होईल असे पुण्याची जनता सांगत आहे.निवडणुकीच्या कामाला लागा असा आदेश देतानाच अजितदादांकडून काम करुन घ्या,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.वाढत्या महागाईच्या विरोधात भाऊबीजेच्या दिवशी आंदोलन करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने ड्रग्स घेतले नाही तर मग २५ दिवस त्याला आत का बसवलं ? असा सवालही त्यांनी यावेळी केला.हा विषय महाराष्ट्रापुरता किंवा देशापुरता नाही तर शाहरुख खान हा आंतरराष्ट्रीय कलाकार आहे. त्यामुळे अशा प्रकारामुळे भारताचेही नाव खराब होते.असेही त्या म्हणाल्या.यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचाही समाचार घेतला.पाटील यांनी मलिक यांच्यावर टीका करताना अशी माणसं आमच्या खिशात असतात, असे वक्तव्य केले होते.त्यालाही त्यांनी यावेळी प्रत्युत्तर दिले.आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. आमच्या तोंडी अशी भाषा येत नाही अशा शब्दात त्यांनी पाटील यांना टोला लगावला.

Previous articleजोपर्यंत हे प्रकरण धसास लावत नाही तोपर्यंत थांबणार नाही : मलिकांचा गर्भित इशारा
Next articleठरल्याप्रमाणे सगळे झाले असते तर आज मी फोटोग्राफी करत असतो